देवळालीत कोयता गँगचा मध्यरात्री रक्ताचा खेळ! सोशल मीडियावर भाईगिरी, रस्त्यावर मृत्यूचे तांडव! खाकीचा धडाका; एका नराधमाच्या मुसक्या आवळल्या, दोघे फरार!

शांत देवळालीला गुन्हेगारीचे ग्रहण लावणाऱ्या समाजकंटकांना पोलिसांनी काही तासांतच दाखवली कायद्याची जरब; वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या नेतृत्वात तपासाची चक्रे गतिमान!

लाल 🚨 दिवादेवळाली कॅम्प, दि. २३: शांत आणि सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असलेल्या देवळाली कॅम्पच्या शांततेवर मध्यरात्री कोयत्याचा नंगानाच मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर कोयते मिरवून ‘भाईगिरी’ करणारे व्हिडिओ व्हायरल करून तरुणाईची माथी भडकवणारे काही ‘चिनपट भाई’ आणि टवाळखोर गुन्हेगारांनी अखेर आपला सैतानी चेहरा उघड केला. मंगळवारी मध्यरात्री एका निरपराध नागरिकावर पैशांसाठी कोयत्याने प्राणघातक हल्ला करून, रस्त्यावर धिंगाणा घालत त्यांनी संपूर्ण परिसरात मृत्यूची दहशत निर्माण केली. परंतु, या नराधमांचा हा हिंसक खेळ फार काळ चालला नाही. घटनेची माहिती मिळताच देवळाली कॅम्प पोलिसांनी ‘सिंघम’ अवतारात विजेच्या गतीने कारवाई करत गुन्हेगारीचा हा डाव उधळून लावला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी संतोष राजेंद्र जाधव (वय ३९, रा. मटण मार्केट, संसरी) हे रात्री एकच्या सुमारास आपले काम आटोपून घरी परतत होते. जेव्हा ते सिलेक्शन कॉर्नर दुकानासमोर आले, तेव्हा ॲक्टिव्हा दुचाकीवरून (एमएच १५ जेव्ही ४०७७) आलेल्या तीन सैतानांनी त्यांचा रस्ता अडवला. योगेश सुनील जाधव, ऋषीकेश दिनेश लोखंडे आणि यश विकास मोरे या तिघांच्या हातात मृत्यूचे शस्त्र म्हणजेच धारदार कोयते तळपत होते.

या टवाळखोरांनी संतोष यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, कष्टाच्या कमाईचा एकही रुपया या गुंडांना देण्यास संतोष यांनी बाणेदारपणे नकार दिला. हा नकार त्या नराधमांच्या जिव्हारी लागला. क्षणाचाही विलंब न लावता, त्यांनी संतोष यांच्या डोक्यावर थेट कोयत्याने वार केला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या संतोष यांना त्यांनी लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील ३,६०० रुपयांची रोकड हिसकावून घेतली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर जणू काही कायद्याचे राज्यच संपले आहे, अशा थाटात ते रस्त्यावर हातात कोयते घेऊन नाचत, आरडाओरड करत दहशत निर्माण करू लागले.

आणि मग… अवतरली ‘खाकी’!

या थरारक घटनेची माहिती मिळताच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचारी क्षणात सतर्क झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. श्रीनिवास देशमुख यांनी तात्काळ सूत्रे हाती घेऊन तपासाची चक्रे फिरवली. जखमी संतोष जाधव यांना रुग्णालयात दाखल करून, त्यांनी आरोपींना जेरबंद करण्यासाठी पथके रवाना केली. या गुन्ह्याच्या तपासाची जबाबदारी धडाडीचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे यांच्यावर सोपवण्यात आली.

 

रात्रभर पोलिसांनी गुप्त खबऱ्यांचे जाळे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच या टोळीतील मुख्य सूत्रधार योगेश सुनील जाधव याला बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांच्या या तुफानी कारवाईने गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

या घटनेबाबत बोलताना पोलीस उपायुक्त श्री. किशोर काळे यांनी सांगितले की,

“शहराची शांतता भंग करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला आम्ही कदापि खपवून घेणार नाही. सोशल मीडियावरून दहशत माजवणाऱ्या अशा गुंडांवर आमची करडी नजर आहे. या प्रकरणातील फरार आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल. कायद्याचा बडगा उगारला जाईलच!”

सध्या जखमी संतोष जाधव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपी ऋषीकेश लोखंडे आणि यश मोरे यांचा पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देवरे आणि त्यांचे पथक युद्धपातळीवर शोध घेत आहेत. या धडाकेबाज कारवाईमुळे देवळालीच्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!