ना २४ तास, ना १२ तास, फक्त ४ तास! आयशानगर पोलिसांचा ‘सुपरफास्ट’ तपास, खुनी जेरबंद! रक्ताचा सडा वाळण्याआधीच मारेकरी कायद्याच्या कचाट्यात.

जुन्या वैमनस्याचा रक्तरंजित शेवट, पोलिसांच्या चाणाक्ष तपासामुळे सराईत गुन्हेगार गजाआड.

लाल 🚨 दिवा-मालेगाव, दि. २२ सप्टेंबर:शहरातील आयशानगर परिसरात काल रात्री एका तरुणावर धारदार कोयत्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण मालेगाव शहर हादरले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह पाहून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. मात्र, आयशानगर पोलिसांनी दाखवलेल्या अभूतपूर्व तत्परतेमुळे आणि कौशल्यामुळे या गुन्ह्याचा छडा अवघ्या ४ तासांच्या आत लागला असून, हत्येतील दोन्ही नराधम आरोपी आता तुरुंगाची हवा खात आहेत. पोलिसांच्या या ‘सिंघम’ स्टाईल कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिनांक २१ सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी आयशानगर हद्दीतील फैजान शेठ यांच्या लुम कारखान्यासमोर, मोहमद मतीन मोहमद मोबीन (वय १९) या तरुणाला दोन अज्ञात इसमांनी गाठले. जुन्या भांडणाची कुरापत काढून आरोपींनी मतीनला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. काही कळायच्या आतच, त्यापैकी एकाने आपल्याजवळील लोखंडी धारदार कोयता बाहेर काढला आणि मतीनच्या छातीवर डाव्या बाजूस सपासप वार केले. या प्राणघातक हल्ल्यात मतीन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आयशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच संपूर्ण पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली.

घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. तेगबीर सिंह संधू आणि मालेगाव शहराचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. सिध्दार्थ बरवाल यांनी आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याचे आदेश दिले. वरिष्ठांचे आदेश मिळताच आयशानगर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून आरोपींचे वर्णन आणि त्यांच्या विशिष्ट बोलीभाषेची माहिती मिळताच पोलिसांचा संशय बळावला. आपल्या गुप्त खबऱ्यांचे जाळे आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर पोलिसांनी दोन संशयितांना शिताफीने उचलले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेले सैय्यद वसीम उर्फ वस्या (वय २१) आणि रईस अहमद उर्फ रईस काल्या (वय १९) हे दोघेही सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या दोघांना पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आपणच मोहमद मतीनची हत्या केल्याची कबुली दोघांनी दिली. विशेष म्हणजे, या दोन्ही आरोपींवर यापूर्वीही शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, आयशानगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि गौतम तायडे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने ही धाडसी कामगिरी केली आहे. अवघ्या चार तासांत खुनाचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना गजाआड केल्याने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून, सामान्य नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पुढील तपास सपोनि श्री. गौतम तायडे करीत आहेत.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!