नाशिक पोलिसांचा ‘मोहिते’ पॅटर्न! मध्यरात्रीच्या थरारानंतर कंटेनर लुटारू अखेर गजाआड!

गुंडा विरोधी पथकाचे ‘विशेष शस्त्र’ ठरले निर्णायक; आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाचे २४ तासात पालन

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि.१९:-प्रतिनिधी:नाशिक शहराला हादरवून सोडणाऱ्या कंटेनर दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळण्यात गुंडा विरोधी पथकाला अखेर यश आले आहे. रात्रीच्या अंधारात धारदार शस्त्राने दहशत निर्माण करून लूटमार करणाऱ्या या टोळीने पोलिसांना आव्हान दिले होते. मात्र, गुंडा विरोधी पथकाचे प्रमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, जे ‘आयुक्तालयाचे विशेष शस्त्र’ म्हणून ओळखले जातात, त्यांच्या अचूक नियोजनामुळे आणि धाडसी कारवाईमुळे या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले.

 

 

दिनांक ०७ सप्टेंबरच्या काळोख्या पहाटे, नाशिकरोडच्या निर्मनुष्य दारणा नदी पुलावर एका कंटेनर चालकासाठी जणू काळच दबा धरून बसला होता. फिर्यादी रामनिवास वर्मा हे महिंद्रा कंपनीचा माल कंटेनरमधून घेऊन जात असताना, अचानक एका टोळक्याने त्यांचा कंटेनर अडवला. काही कळायच्या आतच, आरोपींनी वर्मा यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला, त्यांच्या मनगटावर आणि गळ्यावर वार करून जीवे मारण्याची धमकी दिली. या दहशतीच्या जोरावर आरोपींनी त्यांच्याकडील रोख रक्कम आणि ऑनलाइन पेमेंटद्वारे एकूण ६,००० रुपये हिसकावून अंधारात पोबारा केला. या घटनेने वाहतूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

आयुक्तालयाचे ‘विशेष शस्त्र’ सरसावले!

नाशिकरोड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपासाला सुरुवात केली आणि दोन महिला आरोपींना अटकही केली. मात्र, गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार असलेले तीन सराईत गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देत फरार झाले होते. गुन्हेगारांच्या या धाडसामुळे पोलीस दलाची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप मिटके यांनी हे प्रकरण गुंडा विरोधी पथकाकडे सोपवले. ही जबाबदारी खांद्यावर पडताच, पथकाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांचे सहकारी कामाला लागले.

ज्ञानेश्वर मोहिते यांनी आपल्या गुप्त खबऱ्यांचे जाळे सक्रिय केले. त्यांना माहिती मिळाली की, हे फरार आरोपी जेलरोडच्या दसक भागातील करंजकर नगर परिसरात रात्रीच्या वेळी वावरत आहेत. या एका धाग्याच्या आधारे मोहिते यांनी आपल्या पथकाच्या दोन टीम तयार केल्या आणि संपूर्ण रात्र आरोपींचा माग काढत परिसर पिंजून काढला. अथक प्रयत्नांनंतर, आज दुपारी त्यांना एका अर्धवट बांधकाम झालेल्या विहार बिल्डिंगमधील पत्र्याच्या शेडमध्ये काही संशयित लपल्याची पक्की खबर मिळाली.

क्षणाचाही विलंब न लावता, पथकाने संपूर्ण इमारतीला चारही बाजूंनी घेराव घातला. आतमध्ये काय वाढून ठेवलंय याची कल्पना नसताना, अत्यंत शिताफीने आणि धाडसाने पोलिसांनी पत्र्याच्या शेडवर झडप घातली. पोलिसांच्या या धडक कारवाईने आरोपींची झोप उडाली. पोलिसांनी प्रेम धाटे (वय २४), धीरज धाटे (वय २२) आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.

कामगिरी कौतुकास्पद!

आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वात मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, दयानंद सोनवणे, घनश्याम महाले आणि सुनीता कवडे यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे नाशिक शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले असून, गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ज्ञानेश्वर मोहिते हे खऱ्या अर्थाने आयुक्तालयाचे ‘विशेष शस्त्र’ असल्याचे या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!