नाशिकमध्ये गँगवॉरचा थरार! वर्चस्वाच्या लढाईतून चेहऱ्यावर झाडली गोळी; पोलीस आयुक्त कर्णिकांच्या आदेशानंतर उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळेंच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन ऑलआऊट’, ११ मुसक्या आवळल्या!

मुख्य सूत्रधार विकी वाघ बंधू पोलिसांना देत आहेत गुंगारा; नाशिक खाकीचा गुन्हेगारी टोळ्यांना सज्जड दम !

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. १९ (विशेष प्रतिनिधी):शांत नाशिक शहर पुन्हा एकदा मध्यरात्रीच्या गोळीबाराने हादरले आहे. पंचवटीतील राहुलवाडी परिसरात जुन्या वैमनस्यातून आणि ‘भाई’ बनण्याच्या चढाओढीतून एका युवकाच्या चेहऱ्यावर थेट गोळी झाडून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची थरारक घटना घडली. या घटनेने शहरात गँगवॉर पुन्हा डोके वर काढत असल्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सूत्रे हाती घेताच, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि किशोर काळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली पंचवटी, भद्रकाली आणि गुंडा विरोधी पथकाने ‘सिंघम’ स्टाईलने ‘ऑपरेशन ऑलआऊट’ राबवत अवघ्या काही तासांत ११ संशयितांच्या मुसक्या आवळून गुन्हेगारी विश्वाला सणसणीत चपराक लगावली आहे.

मंगळवार, १७ सप्टेंबरची मध्यरात्र. राहुलवाडी परिसरातील सर्व व्यवहार शांत झाले होते. रात्री सव्वाबाराच्या सुमारास सागर विठ्ठल जाधव (वय ३५) हा तरुण आपल्या घराबाहेरील ओट्यावर बसला होता. परिसरात आपली दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्याच्या इराद्याने पेटलेले विकी उत्तम वाघ, विकास उर्फ विकी विनोद वाघ आणि त्यांच्या साथीदारांनी पूर्वनियोजित कटानुसार सागरला घेरले. काही कळायच्या आत, या टोळक्याने थेट अग्निशस्त्राचा वापर करत सागरवर गोळी झाडली. काळोख चिरत निघालेली ती गोळी सागरच्या डाव्या डोळ्याच्या खाली घुसली आणि तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ला यशस्वी होताच, आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले.

उपायुक्त राऊत आणि काळे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार!

या निर्घृण हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनेची गंभीर दखल घेत आरोपींना तात्काळ जेरबंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर उपायुक्त (परिमंडळ-१) मोनिका राऊत आणि उपायुक्त (परिमंडळ-२)किशोर काळे यांनी स्वतः या प्रकरणावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी तीन विशेष पथके तयार केली. पंचवटी गुन्हे शोध पथक, भद्रकाली गुन्हे शोध पथक आणि गुंडा विरोधी पथक अशा तीनही अनुभवी टीम्सना मैदानात उतरवण्यात आले.

पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी शहरात नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशनचे अभेद्य जाळे विणले. मानवी गुप्तहेर आणि तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर आरोपी वैशालीनगर, नवनाथनगर, फुलेनगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी लपल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली. क्षणाचाही विलंब न लावता, या तिन्ही पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आणि तब्बल ११ संशयितांना त्यांच्या लपण्याच्या ठिकाणाहून उचलले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. परिसरात आपले वर्चस्व निर्माण करणे आणि सागर जाधव याच्यासोबत असलेल्या जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी हा कट रचल्याची कबुली त्यांनी दिली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये निलेश बाळ पवार (२७), आकाश राहुल निकम (२४), रोशन राजेंद्र आहिरे (३०), सचिन मोतीराम गांगुर्डे (२१), इरफान सागिर खाटिक (४४), आकाश उर्फ बंटी राजेंद्र दोंदे (३०), आदित्य दिनेश आहिरे (२२), नितीन रमेश खलसे (३२), साहिल फिरोज शेख (२१), भारत मुकुंद कंकाळ (२५) आणि योगेश भीमराव जाधव (२९) यांचा समावेश आहे. यातील अनेक जण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.

मुख्य सूत्रधार फरार, पोलिसांचे आव्हान कायम !

या कारवाईत ११ जणांना अटक झाली असली तरी, या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार असलेले विकी उत्तम वाघ, विकास उर्फ विकी विनोद वाघ आणि अमोल पारे उर्फ बबल्या हे अद्याप फरार आहेत. हे तिघेही रेकॉर्डवरील खतरनाक गुन्हेगार असून, पोलीस त्यांचा शोध घेण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत.

एकंदरीत, नाशिक पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपायुक्त मोनिका राऊत आणि किशोर काळे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या धडक कारवाईने शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा पोलिसांचा निर्धार पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पवार करत आहेत.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!