अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर! गिरणारे मंडळात शिव रस्त्यांसाठी महसूल विभागाची ‘ट्रॅक्टर फेरी’

सेवा पंधरवडा अंतर्गत पाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी अनोखा उपक्रम; मंडळ अधिकारी, तलाठी थेट ट्रॅक्टरवर; शेतकऱ्यांमधून कौतुकाचा वर्षाव!

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१९:-गिरणारे, [प्रतिनिधी] – एरवी कार्यालयात बसून कामकाज पाहणारे महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्याचे चित्र गिरणारे मंडळात पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजित ‘सेवा पंधरवडा’ निमित्ताने, मंडळ अधिकारी श्रीमती प्रिती अग्रवाल यांच्या नेतृत्वात संपूर्ण पथकाने चक्क ट्रॅक्टरवरून शिवार फेरी काढून शिव रस्त्यांची आणि पाणंद रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. अधिकाऱ्यांच्या या अनोख्या ‘ऑन-फिल्ड’ धडक मोहिमेमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा पहिला टप्पा हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या पाणंद आणि शिव रस्त्यांना समर्पित आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्त्यांचे वाद मिटवणे, रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, भूमी अभिलेख विभागाच्या मदतीने त्यांची मोजणी करून हद्दी निश्चित करणे आणि हे रस्ते गावाच्या नकाशावर अधिकृतपणे चिन्हांकित करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

याच धडक मोहिमेअंतर्गत, मंडळ अधिकारी श्रीमती प्रिती अग्रवाल यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी प्रदीप इंजे, प्रमोद राऊत, प्रिया चौधरी, अनिता जगताप, सागर पवार यांनी गिरणारे, साडगाव, वाडगाव, दुगाव या गावांमध्ये थेट ट्रॅक्टरवर बसून शिवार पालथे घातले. रस्त्यांची अवस्था, अतिक्रमणे आणि शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांनी जागेवरच जाणून घेतल्या. अधिकाऱ्यांचा ताफा थेट शेतात आल्याने उपस्थित ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.

आपल्या समस्या ऐकून घेण्यासाठी अधिकारी थेट शेतात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या अनोख्या ‘ट्रॅक्टर फेरी’चे सर्वत्र कौतुक होत असून, यामुळे शिव रस्त्यांचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल, अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!