नाशिकमध्ये ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले! जॉगिंग ट्रॅकवर गांजा विकणारा पोलिसांच्या जाळ्यात; खंडणी विरोधी पथकाचा मोठा दणका!

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात सापळा रचून कारवाई; ३४ हजारांचा १७०१ ग्रॅम गांजा जप्त, शहरात खळबळ!

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. १९:शहरातील तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या एका गांजा विक्रेत्याच्या खंडणी विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. शहरातील उच्चभ्रू वस्तीतील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकसारख्या सार्वजनिक ठिकाणी गांजा विक्रीचा गोरखधंदा करणाऱ्या शकील आरिफ अन्सारी (वय ४०) याला पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून तब्बल ३४ हजार रुपये किमतीचा १७०१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, या कारवाईने शहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी नाशिक शहराला अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. याच धोरणाची अंमलबजावणी करत खंडणी विरोधी पथक शहरात गस्त घालत होते. दरम्यान, पथकातील पोलीस अंमलदार भगवान जाधव आणि चारूदत्त निकम यांना त्यांच्या गुप्त खबऱ्यामार्फत एक अत्यंत महत्त्वाची आणि खात्रीशीर माहिती मिळाली. इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ, अशोका मेडिकेअर हॉस्पिटलसमोर एक इसम गांजा विकण्यासाठी येणार असल्याची टीप मिळताच पथकाने तात्काळ हालचाल केली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने गुरुवारी (दि. १८) सायंकाळी नमूद ठिकाणी सापळा रचला. संपूर्ण परिसरात पोलीस साध्या वेशात नजर ठेवून होते. सायंकाळी ७:३० च्या सुमारास, संशयित इसम शकील अन्सारी (रा. वडाळा गाव) त्या ठिकाणी येताच पोलिसांना संशय आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटताच पथकाने क्षणाचाही विलंब न लावता त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्या ताब्यात हिरव्या रंगाची पाने, फुले आणि बिया असलेला १७०१ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ३४,०२० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा गांजा तो विक्री करण्याच्याच उद्देशाने त्या ठिकाणी घेऊन आला होता. याप्रकरणी आरोपी शकील अन्सारी विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम ८ (क) आणि २० (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पुढील तपासासाठी इंदिरानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या कारवाईमुळे एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही धाडसी कारवाई पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीपणे पार पाडली. या कामगिरीमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!