नाशिकरोड ! दिवसाढवळ्या महिला बिल्डरच्या घरात जमावाचा धुमाकूळ, लाखोंचा ऐवज लंपास! उपनगर पोलीस गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार!

लाल 🚨 दिवा-नाशिकरोड,दि. १९: साने गुरुजी नगर परिसरात एका महिला बिल्डरच्या घरात 50 ते 55 जणांच्या जमावाने घुसून केलेल्या दहशतीची आणि त्यानंतर झालेल्या लाखोंच्या घरफोडीची थरारक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पोलिसांच्या या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील दत्त मंदिर सिग्नल परिसरातील ‘स्पेस ओरीयन अपार्टमेंट’ मध्ये राहणाऱ्या प्रसिद्ध बिल्डर व डेव्हलपर श्रीमती सिमा विलास कटारे (वय ४२) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, दोन वेगवेगळ्या दिवशी त्यांच्या घरात घुसून जमावाने दहशत माजवली आणि तब्बल २९ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

फिर्यादीनुसार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी त्या घरी असताना कविता पवार, स्नेहल भालेराव, रौफ शेख यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३० ते ३५ महिला आणि १५ ते २० पुरुषांचा जमाव त्यांच्या घरात बळजबरीने घुसला. जमावाने घरात आरडाओरड करत सामानाची प्रचंड नासधूस केली आणि काही सामान इमारतीच्या खाली फेकून देत दहशत माजवली.

हा प्रकार ताजा असतानाच, दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीमती कटारे काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. हीच संधी साधून त्याच आरोपींनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्यांनी घरातील मास्टर बेडरूममधील कपाटात ठेवलेली २५ लाख रुपयांची रोकड, सुमारे १५ ते १६ तोळे वजनाचे साडेचार लाख रुपये किमतीचे स्त्रीधन असलेले सोन्याचे दागिने आणि फिर्यादीच्या मुलाचे वीस हजार रुपये किमतीचे दोन सॅमसंग मोबाईल फोन असा एकूण २९ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला.

घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नाशिकरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. फिर्यादी कटारे यांना धीर देत पोलिसांनी त्यांना संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरसाठ यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३३, ११५(२), ३५२, ३५१ (२), ३२४ (४) अशा अत्यंत गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. दिवसाढवळ्या जमावाने केलेल्या या गुंडगिरीला कायद्याच्या भाषेतच उत्तर दिले जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

“गुन्हेगार कोणीही असो, त्यांची गय केली जाणार नाही. कायद्याच्या कचाट्यातून ते सुटणार नाहीत. आमचे विशेष पथक आरोपींच्या मागावर असून, लवकरच त्यांना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला जाईल. नागरिकांनी निर्भय राहावे.”

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असले तरी, पोलिसांच्या वेगवान आणि सकारात्मक हालचालींमुळे आरोपी लवकरच जेरबंद होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पोलीस उपनिरीक्षक सोनवणे आणि त्यांचे पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहेत.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!