पंचवटीत रक्ताची पहाट! पोलिसांच्या नाकर्तेपणाचा कळस, गुन्हेगार मोकाट, नाशिक हादरले!

साखरझोपेत असलेल्या शहराला गोळीबाराने जाग; सागर जाधव मृत्यूशी झुंजतोय, पोलीस प्रशासन मात्र ‘दिवे’ लावण्यात मग्न!

लाल 🚨 दिवा-आमचा विशेष प्रतिनिधी, नाशिक:दि.१७:-नाशिकची धार्मिक ओळख असलेल्या पंचवटी परिसरात आज गुन्हेगारीने अक्षरशः थैमान घातले. पहाटेच्या शांततेला भेदणाऱ्या गोळीच्या आवाजाने संपूर्ण शहर हादरले असून, सागर जाधव नावाच्या तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे वस्त्रहरण केले आहे. दिवसा-ढवळ्या होणाऱ्या चोऱ्या, लुटमार आणि आता थेट पहाटेच्या वेळी गोळीबार… यामुळे ‘पोलिसिंगचा बोजवारा आणि नागरिकांचा जीव टांगणीला’ लागल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.

मिळालेल्या थरारक माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास सागर जाधव याच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी अत्यंत जवळून गोळी झाडली. ही गोळी सागरच्या गालाला चिरून थेट मानेत घुसली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सागरला स्थानिक नागरिकांनी तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टर त्याचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसिंगचा बोजवारा: ‘कड’ गेले, गुन्हेगार आले!

या घटनेने पंचवटी पोलिसांच्या निष्क्रियतेवर शिक्कामोर्तब केले आहे. एकेकाळी मधुकर कड यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या काळात शांत असलेली पंचवटी आज गुन्हेगारीचा अड्डा का बनली आहे, याचे उत्तर निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. “रात्रगस्तीचे ढोल बडवणारे पोलीस पहाटे साखरझोपेत होते का?” “गुन्हेगारांना आता २४x७ मोकळे रान मिळाले आहे का?” असे संतप्त सवाल विचारले जात आहेत. पाटील यांच्या कारकिर्दीत गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढत असून, ते केवळ ‘निष्क्रिय’ निरीक्षक ठरल्याची घणाघाती टीका होत आहे.

‘आधी पाटील यांना हटवा, मगच पंचवटी वाचेल!’

या भ्याड हल्ल्यानंतर नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या निष्क्रिय कारभारामुळेच गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे. त्यांच्या काळात अवैध धंदे फोफावले असून, सामान्य नागरिक मात्र दहशतीच्या छायेत जगत आहे. “आम्हाला कामाचा अधिकारी हवा, कागदी घोडे नाचवणारा नको. आधी पाटील यांची बदली करा, मगच पंचवटी सुरक्षित होईल,” अशी एकमुखी मागणी जोर धरू लागली आहे.

पोलिसांनी ‘तपास चक्रे वेगाने फिरवत आहोत’ आणि ‘आरोपी लवकरच गजाआड होतील’ असे नेहमीचेच पालूपद लावले आहे. मात्र, रक्ताने माखलेली ही सकाळ पाहिल्यावर, नाशिककरांचा पोलिसांवरील विश्वास उडाल्यात जमा आहे. आता आश्वासने नकोत, तर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारी ठोस कारवाई हवी आहे, अन्यथा हा उद्रेक अधिक तीव्र होईल, हे निश्चित

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!