राज्यातील १५९ पोलीस अंमलदार सहभागी; गुन्हे तपासात शास्त्रीय पुरावे गोळा करण्यावर भर
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. १६ सप्टेंबर:गुन्हेगारी तपासात शास्त्रीय पुरावे गोळा करण्याची क्षमता वाढविण्यासाठी आणि नवीन कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिक येथे ‘I-Bike’ आणि ‘फॉरेन्सिक व्हॅन’ या विषयावरील पाच दिवसीय प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन करण्यात आले. या सत्रासाठी राज्यातील विविध पोलीस आयुक्तालये आणि ३७ जिल्ह्यांमधून एकूण १५९ पोलीस अंमलदार उपस्थित आहेत.
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १७६ (३) नुसार, सात वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये घटनास्थळी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या तज्ञांनी फॉरेन्सिक व्हॅनसह भेट देणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये हे ऐच्छिक आहे. अशा गुन्ह्यांमध्येही शास्त्रीय पुरावे नष्ट होऊ नयेत आणि ते वेळेवर गोळा करता यावेत, यासाठी ‘I-Bike’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येत आहे. अनेकदा दुर्गम किंवा अरुंद ठिकाणी फॉरेन्सिक व्हॅन पोहोचू शकत नाही, अशावेळी I-Bike अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ही संकल्पना सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे.

या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत गवळी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी गुन्हे तपासात फॉरेन्सिक सायन्सचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “शास्त्रीय पुराव्यांमुळे गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे तपासी अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरील पुरावे अत्यंत काळजीपूर्वक हाताळले पाहिजेत.”
या पाच दिवसीय प्रशिक्षणात न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, नाशिक आणि हेलिक अॅडव्हायझरी लि. मुंबई येथील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये अपघाती घटना, लैंगिक अपराध, फॉरेन्सिक किटच्या मदतीने ड्रग्स ओळखणे, डिजिटल पुरावे गोळा करणे, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पुरावे ओळखणे, फॉरेन्सिक मेडिसिन आणि अंगुलीमुद्रा शास्त्र यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
सदर प्रशिक्षण सत्र मा. अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी प्राचार्य श्री. चंद्रकांत गवळी, उपप्राचार्य श्री. मनोज खंडाळे यांच्यासह सत्रसंचालक श्री. नरेंद्र पवार आणि इतर वरिष्ठ अधिकारी परिश्रम घेत आहेत.







