नाशिक पोलिसांचा ‘चाऱ्या’ला दणका! कुख्यात गुन्हेगार पाच महिन्यांनी जेरबंद!

खंडणी विरोधी पथकाची धाडसी कारवाई; बोरगड परिसरातून आवळल्या मुसक्या

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. १६: शहरात दहशत माजवणाऱ्या आणि तब्बल पाच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुख्यात गुन्हेगार सुरज उर्फ चाऱ्या चारोस्कर याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. खंडणी विरोधी पथकाने अत्यंत शिताफीने बोरगड येथील चामार लेणी परिसरात सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी खंडणी विरोधी पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पथक सराईत गुन्हेगारांच्या मागावर होते. दरम्यान, पथकातील पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, गंभीर गुन्ह्यात फरार असलेला ‘चाऱ्या’ नाशिकमध्ये येणार आहे.

या खात्रीशीर माहितीच्या आधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवेंद्रसिंग राजपुत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज दुपारी बोरगड आणि चामार लेणी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचले. दुपारी सव्वातीनच्या सुमारास चाऱ्या (वय २६, रा. म्हसरूळ) परिसरात येताच, दबा धरून बसलेल्या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याला पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.

सराईत गुन्हेगार आणि गुन्ह्यांची मालिका

चाऱ्या चारोस्कर हा म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यात (गु.र.नं. १३५/२०२५) मागील ५ महिन्यांपासून फरार होता. त्याच्यावर यापूर्वीही दिंडोरी आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात मारहाण, घरात घुसून तोडफोड करणे, धमकी देणे आणि मुंबई पोलीस कायद्याचे उल्लंघन करणे असे एकूण चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे परिसरात भीतीचे वातावरण होते.

सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवेंद्रसिंग राजपुत, श्रेपोउनि. दिलीप सगळे, श्रेपोउनि. दिलीप भोई, पो.हवा. योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पो.ना. भुषण सोनवणे, पो.अं. चारूदत्त निकम, भरत राऊत व मपोअं. सविता कदम यांच्या पथकाने केली आहे. चाऱ्याला पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!