राहुल धोत्रे हत्याकांडात सर्वात मोठी कारवाई; हायकोर्टाच्या दणक्यानंतर पळापळ ठरली व्यर्थ!
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि.१५ :नाशिक शहरात थरार निर्माण करणाऱ्या राहुल धोत्रे हत्याकांडात अखेर तो क्षण आला, ज्याची संपूर्ण शहर वाट पाहत होते! पोलिसांना सातत्याने गुंगारा देणारे आणि कायद्याच्या कचाट्यातून निसटण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या अखेर नाशिक शहर गुंडाविरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर निमसे यांच्यासमोरील सर्व मार्ग बंद झाले होते आणि आज या महानाट्यावर पोलिसांनी पडदा टाकला.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव निमसे कोणत्याही क्षणी अटक होऊ शकतात, हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर नाशिक शहर पोलीस आयुक्तलनाने हे प्रकरण गांभीर्याने घेत गुंडाविरोधी पथकाला (Anti-Goonda Squad) निमसे यांना शोधून काढण्याचे आदेश दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निमसे शरण येण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळताच, पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे निमसे ‘स्वतःहून’ पोलिसांच्या स्वाधीन झाले नसून, पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे आणि अटळ कारवाईमुळे त्यांना शरणागती पत्करावी लागली, हे स्पष्ट झाले आहे.

काही महिन्यांपूर्वी नांदूर नाका परिसरात राहुल धोत्रे यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण नाशिक हादरले होते. पोलीस तपासात या हत्येची सूत्रे थेट तत्कालीन नगरसेवक उद्धव निमसे यांच्यापर्यंत पोहोचत असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती. तेव्हापासून निमसे पोलिसांना गुंगारा देत फरार होते.
गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेतल्यानंतर आता निमसे यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस या हत्येमागील संपूर्ण कट उघडकीस आणण्यासाठी, तसेच फरार काळात त्यांना कोणी आणि कशी मदत केली, याचा छडा लावण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. या हाय-प्रोफाइल अटकेमुळे धोत्रे हत्याकांडाच्या तपासाला आता निर्णायक दिशा मिळण्याची शक्यता असून, यामागे आणखी कोण-कोण आहेत, हे लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







