ऐंशी हजारांच्या दागिन्यांवर डल्ला; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पथक घटनास्थळी दाखल, आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी तपासचक्र गतिमान.
लाल 🚨 दिवा-नाशिकरोड, दि. १४ (आमच्या प्रतिनिधीकडून): चक्क पोलिसांच्या नावाने नागरिकांना लुटण्याचा धक्कादायक प्रकार नाशिकरोड परिसरात घडला आहे. भाजीपाला घेऊन घरी परतणाऱ्या एका ६० वर्षीय ज्येष्ठ महिलेला दोन भामट्यांनी ‘हम पोलीसवाले है’ असे सांगून विश्वास संपादन केला आणि हातचलाखीने तब्बल ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, या तोतया पोलिसांना गजाआड करण्याचे खुले आव्हान आता नाशिकरोड पोलिसांनी स्वीकारले आहे. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची अनेक पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोपाळनगर येथील आराधना एनक्लेव्हमध्ये राहणाऱ्या सौ. लता महिंद्र शर्मा (वय ६०) या आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भाजीपाला खरेदी करून आपल्या घराकडे पायी जात होत्या. त्या सोसायटीच्या गेटजवळ पोहोचताच, तिथे आधीपासूनच साध्या वेशातील दोन इसम उभे होते. ग्रे रंगाचा टी-शर्ट आणि पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेल्या अंदाजे ३० ते ४० वयोगटातील या तरुणांनी सौ. शर्मा यांना आवाज दिला.
घाबरलेल्या शर्मा जवळ येताच, त्यापैकी एकाने अत्यंत विश्वासाने सांगितले, “हम आपको कब से आवाज दे रहे है, आपको हमारे बडे साहबने बुलाया है, आप डरो मत हम पोलीसवाले है।” पोलिसांचे नाव ऐकताच शर्मा काहीशा आश्वस्त झाल्या. पुढे काय होणार आहे, याची कल्पनाही त्यांना नव्हती. या भामट्यांनी पुढे चोरीच्या घटना वाढल्याचे सांगत, दागिने घालून फिरणे किती धोकादायक आहे, याची भीती घातली. बोलता बोलता त्यांनी हातचलाखीने सौ. शर्मा यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची ६० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन आणि हातातील ५ ग्रॅम वजनाची २० हजार रुपये किमतीची अंगठी काढून घेतली. काही कळायच्या आत, हे दोन्ही भामटे तिथून पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सौ. शर्मा यांना मोठा धक्का बसला.
पोलिसांची विजेच्या वेगाने सूत्रे हाती!
या घटनेची माहिती मिळताच, नाशिकरोड पोलीस ठाण्यात सायंकाळी ७:५१ वाजता उपनगर पोलीस ठाण्यात गुरनं ३९२/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), २०४, ३ (५) नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक पवार आणि तपासी अंमलदार पोहवा गोसावी (ब.नं. ७७१) यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी करून फिर्यादी सौ. शर्मा यांना धीर दिला. “तुम्ही अजिबात काळजी करू नका, पोलिसांच्या नावाला बट्टा लावणाऱ्या या गुन्हेगारांना आम्ही पाताळातून शोधून काढू,” अशा शब्दांत वपोनि शिरसाठ यांनी त्यांना आश्वस्त केले.
पोलिसांनी तात्काळ परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. आरोपींच्या वर्णनानुसार त्यांचे स्केच तयार करण्याचे काम सुरू असून, शहराबाहेर जाणाऱ्या सर्व मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. खबऱ्यांचे जाळेही सक्रिय करण्यात आले असून, पोलिसांची विविध पथके आरोपींच्या मागावर रवाना झाली आहेत. खाकी वर्दीच्या नावाखाली सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या या भामट्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास नाशिकरोड पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये आणि कोणी पोलिसांची बतावणी करत असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.







