घरून बाहेर गेलेला तरुण परतलाच नाही; पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल, फॉरेन्सिक पथकाकडून पुरावे गोळा करण्यास सुरुवात.
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१३:-इंदिरानगर परिसरातील लेखानगर येथे राहणाऱ्या संतोष उर्फ छोटू काळे (वय ३८) या तरुणाची काल रात्री दगडाने ठेचून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गरवारे बस स्टॉपजवळ रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. “थोड्या वेळात येतो,” असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या संतोषवर काळाने घाला घातल्याने काळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संतोष काळे हा वसाहत क्रमांक एक, लेखानगर येथे आपल्या कुटुंबासह राहत होता. काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तो ‘थोड्या वेळात परत येतो’ असे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, रात्री उशीर झाला तरी तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो बंद येत होता. त्यामुळे काळजीत पडलेल्या त्याच्या वडिलांनी मध्यरात्री इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांचे पथक परिसरात शोध घेत असताना, गरवारे बस स्टॉपजवळच्या अंधाऱ्या कोपऱ्यात एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली असल्याचे आढळून आले. पोलिसांनी जवळ जाऊन पाहिले असता, तो संतोष काळेच असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर दगडाचे वर्मी घाव घालून त्याला अमानुषपणे संपवण्यात आले होते. घटनास्थळाचे दृश्य अत्यंत भीषण होते.
घटनेचे गांभीर्य ओळखून, इंदिरानगर पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून, मारेकऱ्यांचा माग काढण्यासाठी फॉरेन्सिक लॅबच्या पथकालाही (Forensic Lab Van) पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून रक्ताचे नमुने, फिंगरप्रिंट्स आणि इतर महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
या निर्घृण हत्येमागे नेमके कारण काय? ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाली की यामागे आणखी काही कारण आहे, याचा उलगडा आता फॉरेन्सिक अहवाल आणि पोलिसांच्या तपासातूनच होणार आहे. दोन अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, इंदिरानगर पोलीस पुढील तपास करत आहेत.







