नाशिकमध्ये खाकीचा ‘महा-एक्शन प्लॅन’! गुन्हे शाखा युनिट-२ च्या वादळी कारवाईने गुन्हेगारी विश्व हादरले!..( घरात घुसून तोडफोड करणारे, मालेगावचे आंतरजिल्हा चोरटे, हातात तलवारी घेऊन दहशत पसरवणारे सराईत आणि कायद्याला न जुमानणारे तडीपार… सगळेच एकाच वेळी जेरबंद! )

चोर, गुंडे आणि तडीपार… गुन्हे शाखा युनिट-२ च्या जाळ्यात; शहरात कायदा-सुव्यवस्थेचा दबदबा!

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१२ : शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी गुन्हेगारांविरोधात ‘ऑपरेशन ऑलआऊट’चे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करत गुन्हे शाखा युनिट-२ ने शहरात अक्षरशः कारवाईचा धडाका लावला आहे. एकापाठोपाठ एक केलेल्या धडक कारवायांमध्ये घरात घुसून दहशत माजवणारे, आंतरजिल्हा चोरी करणारे, हातात तलवारी घेऊन दहशत पसरवणारे आणि कायद्याला न जुमानता शहरात वावरणाऱ्या तडीपार गुंडांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

थरार… घरात घुसून तोडफोडीचे आरोपी पाथर्डीतून जाळ्यात !

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरात घुसून सामानाची तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण करणारे अमोल गायकवाड आणि स्वप्निल जाधव हे गुन्हे शाखेच्या नजरेतून सुटू शकले नाहीत. पो.हवा. चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, सपोनि हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पाथर्डी गावात सापळा रचून दोघांनाही शिताफीने जेरबंद केले. पोलीसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना अंबड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

मालेगावपर्यंत धागेदोरे, चोरीचा गुन्हा उघड !

पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेने थेट मालेगाव गाठले. पो.हवा. प्रकाश महाजन यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर चोरीचा मोबाईल मालेगावात असल्याचे शोधून काढले. वरिष्ठांच्या आदेशाने पथकाने मालेगावात अहोरात्र परिश्रम घेऊन सुफीयान रौफ शहा, सगीर अन्सारी आणि मोहम्मद अमीन या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १०,००० रुपये किमतीचा मोबाईल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईमुळे आंतरजिल्हा चोरट्यांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तलवारबहाद्दर रेकॉर्डवरील गुन्हेगार गजाआड!

शहरात कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. चिंचोली फाट्यावर हातात धारदार तलवार घेऊन दहशत पसरवणाऱ्या योगेश नवाळे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची माहिती पो.हवा. नितीन फुलमाळी यांना मिळाली. पथकाने क्षणाचाही विलंब न करता सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक नव्हे, तर दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या असून, त्याच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तडीपारांची मस्ती जिरवली, दोघे जेरबंद!

शहरातून हद्दपार करूनही पुन्हा शहरात घुसखोरी करणाऱ्या गुंडांना गुन्हे शाखेने चांगलाच धडा शिकवला आहे. देवळाली कॅम्प परिसरात तडीपार आरोपी शादाब सैयद आणि मुजफ्फर खान हे बिनधास्तपणे वावरत असल्याची अचूक माहिती श्रेणी पोउनि मुक्तारखान पठाण आणि सपोउनि गुलाब सोनार यांना मिळाली. वरिष्ठांच्या आदेशाने पथकाने अत्यंत शिताफीने दोघांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. शहरात प्रवेशाची कोणतीही परवानगी नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना देवळाली कॅम्प पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) कीरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२ चे प्रभारी अधिकारी सपोनि हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने, ज्यात श्रेणी. पोउनि यशवंत बेंडकोळी, प्रेमचंद गांगुर्डे, मुक्तारखान पठाण, सपोउनि बाळु शेळके, विलास गांगुर्डे, गुलाब सोनार तसेच पोलीस अंमलदार संजय सानप, नंदकुमार नांदुर्डीकर, प्रकाश बोडके, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, नितीन फुलमाळी, अतुल पाटील, प्रवीण वानखेडे, महेश खांडबहाले, संजय पोर्टींदे यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. या सलग कारवायांमुळे नाशिक शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!