ट्रकचे घटस्फोट! बॉडी आणि चेसिस झाले विभक्त, पेठ रोड बनला साक्षीदार!
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. १२ सप्टेंबर (आमच्या स्टंटबाज प्रतिनिधीकडून):अपघात आपण रोजच पाहतो, पण आज नाशिकच्या पेठ रोडवर जो ‘कलाप्रकार’ सादर झाला, तो पाहून तुम्ही थक्क व्हाल! सकाळी साधारण सातच्या सुमारास, कामावर जाण्याच्या घाईत असलेल्या नाशिककरांना एका ट्रकने (MH04 GC 3857) असा काही चित्तथरारक “ब्रेक डान्स” करून दाखवला की वाहतूकच काय, पण बघणाऱ्यांचे श्वासही काही क्षण थांबले.
सप्तरंग स्टॉपजवळच्या भगर मिल परिसरातून हा ट्रक पुठ्ठ्यांचा डोंगर घेऊन निघाला होता. कदाचित मालकाने “थोडा और चलेगा” या भावनेतून ट्रकवर क्षमतेपेक्षा जास्त पुठ्ठे लादले असावेत. हा अपमान ट्रकच्या एका स्वाभिमानी टायरला सहन झाला नाही. त्याने मालकाच्या धोरणाविरोधात ‘बंड’ पुकारले आणि ‘मी नाही सहन करणार!’ अशी किंकाळी फोडत रस्त्यावरच आपले प्राण सोडले.
टायरच्या या बंडखोरीमुळे ट्रकचा तोल गेला. काही क्षण तो एखाद्या मद्यधुंद माणसासारखा रस्त्यावर डुलक्या घेऊ लागला आणि पुढच्याच क्षणी, एखाद्या जादूगाराने दोन तुकडे करावेत, तशी ट्रकची वरची बॉडी आणि खालची चेसिस क्षणार्धात वेगळी झाली! जणू काही आत्मा आणि शरीर वेगळे झाले होते. ट्रकने रस्त्यावरच एका विचित्र योगासनात स्वतःला झोकून दिले.
चालक सुखरूप, पण वाहतूक कोमात !

या संपूर्ण ‘महानाट्यात’ ट्रक चालकाची भूमिका केवळ प्रेक्षकाची होती. तो केबिनमध्ये बसून आपल्या ट्रकचा हा अजब पराक्रम पाहत होता. सुदैवाने, या स्टंटबाजीमध्ये त्याला साधा ओरखडाही आला नाही. मात्र, ट्रकच्या या अचानक घेतलेल्या ‘आडव्या झोपेमुळे’ रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सकाळच्या वेळी कामावर निघालेल्या लोकांना हा ‘फ्री शो’ पाहावा लागला, ज्यामुळे काही काळ वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.
सध्या तरी नाशिककर या ‘ट्रकच्या डान्स’चीच चर्चा करत आहेत. अपघात तर रोज होतात, पण असा ‘कलाकार’ ट्रक क्वचितच पाहायला मिळतो







