धुळे मनपात लाचखोरीचे ग्रहण; ७ हजारांची लाच घेताना आरोग्य विभागाचा मुकदम रंगेहाथ!

सफाई कर्मचाऱ्याची ऑगस्ट महिन्याची हजेरी पाठवण्यासाठी मागितली होती लाच, एसीबीच्या पथकाने आवळल्या मुसक्या.

लाल 🚨 दिवा-धुळे, दि. ११ (प्रतिनिधी):स्वतःच्या हक्काचा पगार मिळवण्यासाठीही लाच द्यावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार धुळे महानगरपालिकेत उघडकीस आला आहे. सफाई कर्मचाऱ्याकडून त्याच्या कामाची हजेरी लावण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोग्य विभागाच्या मुकदमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. रवींद्र शामराव दुमाळ (वय ५०) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर मुकदमचे नाव आहे. या कारवाईमुळे महानगरपालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार हे धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात वार्ड क्र. १४ मध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. आरोपी मुकदम रवींद्र भुमाळ याच्याकडे सफाई कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी स्वच्छता निरीक्षकाकडे पाठवण्याची जबाबदारी आहे. तक्रारदार कर्मचाऱ्याचा ऑगस्ट २०२४ महिन्याचा पगार निघावा यासाठी त्याची हजेरी पाठवणे आवश्यक होते.

मात्र, आरोपी भुमाळ याने ही हजेरी पाठवण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे चक्क ८,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. इतकेच नव्हे, तर ‘जर पैसे दिले नाही, तर तुझी ऑगस्टची हजेरी लावणार नाही आणि पुढच्या महिन्याचा पगारही मिळू देणार नाही,’ अशी धमकीही त्याने दिली होती.

या सततच्या त्रासाला कंटाळून आणि हक्काच्या पगारासाठी होणारी अडवणूक पाहून धाडसी सफाई कर्मचाऱ्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले आणि तक्रार दाखल केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची तात्काळ पडताळणी केली. तडजोडीअंती लाचेची रक्कम ७,००० रुपये देण्याचे ठरले. आज, ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ७,००० रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सापळा रचून रवींद्र भुमाळ याला रंगेहाथ पकडले. अचानक झालेल्या या कारवाईने भुमाळ याची बोबडीच वळली.

या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात आरोपी भुमाळ विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कारवाईने मनपातील अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!