दिंडोरी पोलिसांची धाडसी कारवाई ! सावळघाटातील थरार संपला! चालत्या ट्रकमधून ‘फिल्मी स्टाईल’ चोरी करणारी टोळी गजाआड!

दिवसा शेतमजूर, रात्री लुटारू; दिंडोरी पोलिसांच्या सापळ्यात ८ सराईत गुन्हेगार जेरबंद

लाल 🚨 दिवा-दिंडोरी, प्रतिनिधी दि.११:-काळोख्या रात्री, घाटवळणाच्या रस्त्यावर धावत्या वाहनांवर चित्त्याच्या चपळाईने चढून मालावर डल्ला मारणाऱ्या आणि गेल्या दोन वर्षांपासून नाशिक-पेठ महामार्गावरील सावळघाटात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत टोळीच्या मुसक्या आवळण्यात दिंडोरी पोलिसांना अखेर यश आले आहे. एखाद्या थरारपटालाही लाजवेल अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्या या टोळीमुळे वाहनचालक आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले होते. या कारवाईमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

दिनांक ०५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्रीच्या वेळी पेठहून नाशिककडे निघालेल्या आयशर ट्रक (क्र. एम. एच. २१ बी. एच. ९९२२) चा सावळघाटात वेग कमी होताच, अज्ञात चोरट्यांनी चालत्या गाडीवर चढून ताडपत्री कापली आणि गाडीतील मोती साबणाचे तब्बल ५ बॉक्स लंपास केले. याप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (क), (ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सावळघाटात अशा घटना सातत्याने घडत असल्याने या टोळीचा बंदोबस्त करणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले होते.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता, गुन्ह्याची एक धक्कादायक पद्धत समोर आली. हे सर्व आरोपी दिवसा दिंडोरी आणि निफाड तालुक्यात शेतमजुरीची कामे करून सर्वसामान्य जीवन जगत होते. मात्र, रात्र होताच त्यांचे रूप पालटायचे. रात्रीच्या अंधारात ते सावळघाटातील झाडाझुडपांमध्ये दबा धरून बसायचे. घाटात वाहनांचा वेग कमी होताच, टोळीतील काही सदस्य चालत्या लक्झरी बसच्या टपावर चढून प्रवाशांच्या बॅगा चोरत, तर काही जण मालवाहू ट्रकच्या मागे चढून कटरने ताडपत्री फाडत. त्यानंतर आतील माल खाली फेकून देत आणि त्यांचे इतर साथीदार तो माल गोळा करून जंगलात पसार होत असत.

वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे दिंडोरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळाची पाहणी, परिसरात पाळत आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यामागे सुरगाणा तालुक्यातील सराईत गुन्हेगारांचा हात असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सुरगाणा, निफाड आणि दिंडोरी तालुक्यातून आठ जणांच्या टोळीला वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले आरोपी

1. रविंद्र अंबादास दळवी (वय २५)

2. माधव चंदर शेखरे (वय ३०)

3. लालू गोरख पवार (वय २६)

4. गणेश हौसीराम कडाळे (वय ३२)

5. आनंदा भास्कर पवार (वय २२) (सर्व रा. नागशेवडी, ता. सुरगाणा)

6. दिनेश रामदेव गवारे (वय २५, रा. करंजाळी, ता. दिंडोरी)

7. चेतन प्रभाकर चारोस्कर (वय २५, रा. गोंडेगाव, ता. निफाड)

8. संजय प्रभाकर बेंडकोळी (वय ३०, रा. लखमापुर, ता. दिंडोरी)

या धाडसी कामगिरीमुळे दिंडोरी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून, या टोळीने आणखी किती गुन्हे केले आहेत याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!