नाशिकरोड पोलिसांची ‘सिमेंट’सारखी पक्की कामगिरी! मालधक्क्यावरून ट्रक चोरणारी टोळी बाजारात माल विकतानाच जेरबंद!

देवळाली गावच्या सोमवार बाजारात रचला फिल्मी स्टाईल सापळा; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे अटकेत.

लाल 🚨 दिवा-नाशिकरोड, दि.९;-प्रतिनिधी:नाशिकरोडच्या मालधक्का परिसरातून सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला टाटा ट्रक चोरून त्याची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असलेल्या सराईत चोरट्यांच्या टोळीच्या नाशिकरोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. देवळाली गाव येथील सोमवार बाजारात चोरीच्या सिमेंटची विक्री करण्यासाठी आले असता, गुन्हे शोध पथकाने अत्यंत शिताफीने सापळा रचून आरोपींना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, व्यावसायिक अनिल बाळासाहेब शिरसाठ यांनी आपला टाटा कंपनीचा ट्रक (क्र. एमएच १७ सी ६२४७) दि. ५ ते ८ सप्टेंबर २०२५ दरम्यान मालधक्का येथील पार्किंगमध्ये उभा केला होता. या ट्रकमध्ये अल्ट्राटेक कंपनीच्या ३२ सिमेंटच्या गोण्या होत्या. मात्र, चोरट्यांनी संधी साधून ट्रक आणि त्यातील सिमेंट असा एकूण ५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पथकातील पोलीस अंमलदार अरुण गाडेकर आणि रोहित शिंदे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून (खबऱ्याकडून) एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. चोरीला गेलेला ट्रक आणि आरोपी देवळाली गावच्या सोमवार बाजारात सिमेंटच्या गोण्या विकण्यासाठी येणार असल्याची पक्की खबर मिळताच, पथकाने क्षणाचाही विलंब न लावता सापळा रचला.

बाजारात संशयास्पद हालचाली दिसताच पोलिसांनी झडप घालून राजू पुंडलिक चंद्रमोरे (वय ३५), सुरज शाम कदम (वय २९) आणि रोहन राजु गाँड (वय २१, सर्व रा. रमाबाई आंबेडकर नगर, मालधक्का) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा पिवळ्या-निळ्या रंगाचा ट्रक आणि १२,००० रुपये किमतीच्या ३२ सिमेंटच्या गोण्या असा एकूण ५,१२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवघ्या काही दिवसांत गुन्हा उघडकीस आणल्याने नाशिकरोड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही कौतुकास्पद कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, पोलीस उपायुक्त श्री. किशोर काळे, सहा. पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बडेसाब नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाचे सपोनि प्रविण सुर्यवंशी, पोहवा विशाल पाटील, पो.अं. महेंद्र जाधव, अरूण गाडेकर, सागर आडणे, रोहीत शिंदे, योगेश रानडे यांनी केली आहे. वरिष्ठांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोहवा विशाल पाटील व महेंद्र जाधव करीत आहेत.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!