नाशिकरोड पोलिसांची चित्त्याच्या वेगाने कारवाई! अवघ्या काही तासांत घरफोडीचा छडा, १६ लाखांच्या सोन्यासह आरोपी जेरबंद!

सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरातून अटक; वयोवृद्ध महिलेला लग्नाच्या आठवणी परत मिळाल्याने अश्रू अनावर.

लाल 🚨 दिवा-नाशिकरोड, दि.८:-प्रतिनिधी:एका ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या घरातून तब्बल १५ तोळे सोन्याचे दागिने चोरून पोलिसांना आव्हान देणाऱ्या चोरट्याच्या नाशिकरोड पोलिसांनी अवघ्या काही तासांत मुसक्या आवळल्या आहेत. अत्यंत चिकाटीने आणि कौशल्याने तपास करत पोलिसांनी केवळ आरोपीलाच गजाआड केले नाही, तर चोरीला गेलेला १६ लाखांचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून वृद्ध दाम्पत्याला मोठा दिलासा दिला आहे. या धडाकेबाज कामगिरीमुळे नाशिकरोड पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पळसे येथील फुले नगर परिसरात राहणाऱ्या श्रीमती विमल कुन्हे (वय ७०) यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने घरातील १५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. दिनांक ३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान ही घटना घडली. कुन्हे यांनी हे दागिने लग्नाच्या आठवणी म्हणून जीवापाड जपले होते. आयुष्यभराची पुंजी चोरीला गेल्याने या वृद्ध दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. याप्रकरणी ३ सप्टेंबर रोजी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र सपकाळे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. सपोनि प्रवीण सूर्यवंशी आणि पोउनि संदीप पवार यांच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता तपासाला सुरुवात केली.

सीसीटीव्ही ठरले ‘तिसरा डोळा’:पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. आरोपीच्या येण्या-जाण्याच्या मार्गाचा माग काढत पोलिसांनी अत्यंत चिकाटीने तपास पुढे नेला.

खबऱ्यांची मोलाची माहिती: तपास सुरू असतानाच पोलीस शिपाई विशाल कुंवर व समाधान वाने यांना त्यांच्या गोपनीय खबऱ्याकडून एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. एक संशयित इसम चोरीचे दागिने विकण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची पक्की खबर त्यांना मिळाली.

असा रचला सापळा: मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ रेल्वे स्टेशन परिसरातील नवले ब्रिजखाली सापळा रचला. काही वेळातच संशयित शुभम विकी मोरे (वय २४, रा. विजयनगर, चेहडी पंपिंग) तिथे आला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, आधीच सावध असलेल्या पोलिसांनी झडप घालून त्याला जागीच पकडले. त्याच्या अंगझडतीत एक लाख रुपये किमतीची सोन्याची पोत सापडताच पोलिसांचा संशय बळावला.

पोलिसी खाक्या दाखवताच दिली कबुली:

पोलिसांनी शुभम मोरे याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्यानेच पळसे येथे घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी सोन्याची पोत, मनचली पोत, एकदाणी, कानातले, लॉकेट, अंगठ्या, पाटल्या आणि बांगड्या असा एकूण १६ लाख रुपये किमतीचा १५ तोळे सोन्याचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला.

“पोलिसांमुळे माझे सौभाग्य परत मिळाले!“

चोरीला गेलेले दागिने परत मिळताच वृद्ध फिर्यादी विमल कुन्हे आणि त्यांच्या पतीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. “हे दागिने म्हणजे आमच्या लग्नाच्या आणि सुखी संसाराच्या आठवणी होत्या. त्या गेल्याने आम्ही खचून गेलो होतो. पण नाशिकरोड पोलिसांनी देवासारखे धावून येत आमचा हा ठेवा परत मिळवून दिला. त्यांचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही,” अशा भावूक शब्दांत त्यांनी पोलिसांचे आभार मानले.

पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, उपायुक्त श्री. किशोर काळे व सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) बडेशाब नाईकवाडे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांनी आणि अंमलदारांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!