सासूच्या आजारपणाला वैतागून गळा दाबल्याचा आरोप, उपचारादरम्यान वृद्धेचा मृत्यू; आरोपी सुनेला बेड्या.
लाल 🚨 दिवा-नाशिक देवळाली कॅम्प, ता. ७:केवळ एका विड्याच्या पानावरून झालेल्या किरकोळ वादाने रौद्ररूप धारण केल्याची आणि नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना देवळाली कॅम्प परिसरातील आडके नगर येथे घडली आहे. आजारपणाने त्रस्त असलेल्या ८९ वर्षीय सासूचा सुनेनेच गळा दाबून जीव घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, नाशिकरोड पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली आहे.
सकिना गफार शेख (वय ८९ वर्षे) असे मृत सासूचे नाव असून, शबाना अब्दुल अजीज शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपी सुनेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना २ सप्टेंबर रोजी दुपारी अडीच ते पावणेतीनच्या सुमारास घडली. मयत सकिना शेख या त्यांची सून शबाना हिच्यासोबत साई दर्शन अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये राहत होत्या.
घटनेच्या दिवशी मयत सकिना यांचा दीर रौफ याने, सकिना यांना खाण्यासाठी पान आणून देण्यास आरोपी शबानाला सांगितले. मात्र, सासूच्या आजारपणाला आणि सततच्या किरकिरीला वैतागलेल्या शबानाने पान आणून देण्यास नकार दिला. या क्षुल्लक कारणावरून सासू-सुनेमध्ये जोरदार वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि संतापाच्या भरात शबानाने आपली वयोवृद्ध सासू सकिना यांचा गळा दोन्ही हातांनी दाबला.
गळा दाबल्याने सकिना यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने उपचारासाठी नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशी (दि. ३ सप्टेंबर) सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेनंतर, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस हवालदार आशिष गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, नाशिकरोड पोलीस ठाण्यात आरोपी सून शबाना शेख हिच्या विरोधात गुन्हा नोंद क्रमांक ९३/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली. आरोपी शबाना शेख हिला अटक करण्यात आली असून, तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे. केवळ एका पानासाठी आणि आजारपणाच्या वैतागातून सुनेनेच सासूचा जीव घेतल्याच्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका क्षणाच्या रागाने संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त केले असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.







