अखेरचा निरोप!,गोदावरीच्या रौद्ररूपातही भक्तीचा महासागर; ‘मोरया’च्या गजराने दसक घाट दुमदुमला!

उपायुक्त किशोर काळेंच्या नेतृत्वात पोलिसांचा अभेद्य सुरक्षा किल्ला; वरुणराजाच्या साक्षीने नाशिकरोडकरांचा लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

लाल 🚨 दिवा-नाशिक रोड,दि.६:- (प्रतिनिधी):दहा दिवसांचा चैतन्यसोहळा… मांगल्याची बरसात… आणि उत्साहाचा परमोच्च बिंदू गाठल्यानंतर अखेर तो क्षण आलाच! जड अंतःकरणाने, पण ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या आश्वासक गर्जनेने आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा. अनंत चतुर्दशीच्या या पावन दिवशी, नाशिकरोड आणि जेलरोड परिसरात अक्षरशः भक्तीचा महासागर उसळला होता. सकाळपासून वरुणराजाने लावलेली रिमझिम हजेरी आणि दुथडी भरून वाहणाऱ्या गोदामाईचे रौद्ररूप, या कशाचीही पर्वा न करता, हजारो भाविकांचे पाय दसक घाटाच्या दिशेने वळले होते.

सकाळपासूनच आसमंतात एक वेगळीच अनुभूती होती. ढगांच्या द्रोणातून वरुणराजा जणू बाप्पावर अभिषेकच घालत होता. मात्र, दुपारचे साडेतीन-चार वाजले आणि जणू निरोपाच्या या सोहळ्यासाठी वरुणराजानेही काही काळ विश्राम घेतला. आभाळ मोकळे होताच, जेलरोड आणि नाशिकरोडच्या कानाकोपऱ्यातून ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर आसमंतात घुमू लागला. ढोल-ताशांचा कडकडाट, टाळ-मृदंगांचा मंजुळ नाद आणि गुलालाची उधळण करत एकेक मूर्ती दसक घाटाकडे मार्गस्थ होऊ लागली. घाटावर पोहोचताच तेथील दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. जिकडे पाहावे तिकडे फक्त मानवी शीर दिसत होती; प्रत्येकाच्या डोळ्यात बाप्पाला निरोप देण्याचे दुःख आणि पुढच्या वर्षीच्या आगमनाची आस स्पष्ट झळकत होती.

गंगापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरीने रौद्ररूप धारण केले होते. खळाळता प्रवाह आणि पाण्याचा प्रचंड वेग पाहता, प्रशासनासमोर एक मोठे आव्हान उभे ठाकले होते. परंतु, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त श्री. किशोर काळे यांनी अक्षरशः येथे किल्लाच लढवला होता. नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र सपकाळे आणि त्यांच्या संपूर्ण फौजफाट्यासह त्यांनी संपूर्ण परिसराला सुरक्षेची अभेद्य तटबंदीच उभारली होती. प्रत्येक लहान-सहान गोष्टीवर त्यांचे बारीक लक्ष होते. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ते स्वतः तळ ठोकून होते आणि क्षणाक्षणाला सूचनांचे बाण सोडत होते. महानगरपालिकेचे कर्मचारी आणि होमगार्ड जवानही डोळ्यात तेल घालून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून होते. नदीपात्राभोवती लावलेले भक्कम बॅरिकेट्स आणि स्वयंसेवकांच्या मदतीने तयार केलेली मानवी साखळी, हे प्रशासकीय नियोजनाचे उत्कृष्ट उदाहरण ठरले.

एकीकडे आरतीचे सूर कानावर पडत होते, तर दुसरीकडे ‘मोरया… मोरया…’चा जयघोष आसमान दणाणून सोडत होता. प्रत्येक चेहरा भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. अखेर, मोठ्या श्रद्धेने आणि जड पावलांनी भाविकांनी आपल्या लाडक्या बाप्पाला खळाळत्या गोदावरीच्या कुशीत विसावण्यासाठी निरोप दिला. तो क्षण मोठा भावनिक होता. डोळ्यांतील अश्रू आणि ओठांवरील ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष, या अद्भुत संगमात बाप्पा अनंत प्रवासाला निघाले.

आज दसक घाटाने केवळ गणेश विसर्जनच नाही, तर निसर्गाच्या आव्हानावर मात करणारी मानवी श्रद्धा, प्रशासकीय कौशल्य आणि अथांग भक्तीचा एक अविस्मरणीय त्रिवेणी संगम अनुभवला…

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!