थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; प्राणीप्रेमींच्या तक्रारीनंतर सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल.
लाल 🚨 दिवा नाशिक,दि.०३(आमच्याप्रतिनिधीकडून):नाशिक शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि क्रूर घटना समोर आली आहे. सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथे एका नराधमाने मुक्या श्वानाला आपल्या दुचाकीला (MH.15.FK.6579) दोरीने बांधून भररस्त्यात फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या अमानुष घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून, याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास, श्रमिकनगर परिसरात माणिक तुकाराम घुगे (वय ४८) नावाचा इसम आपल्या दुचाकीवरून जात होता. यावेळी त्याने एका भटक्या श्वानाच्या पायाला दोरीने बांधले आणि ती दोरी आपल्या गाडीच्या मागे बांधून श्वानाला अक्षरशः रस्त्यावरून फरफटत नेण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून रस्त्यावरील नागरिक सुन्न झाले. काहींनी हा थरारक प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.
हा व्हिडिओ ‘पाँकेअर’ या प्राणी संरक्षण संस्थेच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर होताच खळबळ उडाली. संस्थेचे संस्थापक आणि जीएसटी सल्लागार असलेले साहिल सुनील ठाकूर (वय २८) यांनी तात्काळ या घटनेची दखल घेतली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घटनेची आणि आरोपीची माहिती मिळवली. आरोपीचे नाव माणिक तुकाराम घुगे असून तो अशोक नगर, सातपूर येथील रहिवासी असल्याचे समजताच साहिल ठाकूर यांनी थेट सातपूर पोलीस ठाणे गाठले.
साहिल ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, पोलिसांनी आरोपी माणिक तुकाराम घुगे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३२५ (गंभीर दुखापत करणे) आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ अंतर्गत गुन्हा (क्र. ०२७१/२०२५) दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, मुक्या प्राण्यांवर अशा प्रकारे अमानुष अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पोलीस हवालदार बनकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







