अहिल्यानगरची ‘चोर’ कंपनी दिंडोरीत गजाआड!,बस स्टँडवर वृद्ध महिलेला लुटणारे आंतरजिल्हा चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

स्थानिक गुन्हे शाखा व दिंडोरी पोलिसांची थरारक संयुक्त कारवाई; मुद्देमालासह स्विफ्ट डिझायर कार जप्त

लाल 🚨 दिवा-नाशिक,दिंडोरी, ता. २७ (प्रतिनिधी) :भाड्याने आलिशान कार घ्यायची, वर्दळीचे बस स्टँड हेरायचे आणि महिलांना पुढे करून गर्दीत हातसफाई करत प्रवाशांचे दागिने लंपास करायचे, या हायटेक फंडा वापरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि दिंडोरी पोलिसांना यश आले आहे. दिंडोरी बस स्टँडवर एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपयांची सोन्याची पोत चोरणाऱ्या या टोळीतील दोघांना अहिल्यानगर जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार आणि चोरीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारच्या वेळी दिंडोरी बस स्टँडवर प्रचंड गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील ५०,००० रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी क्षणात लंपास केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दिंडोरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर आणि दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रघुनाथ शेगर यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत बस स्टँड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. शेकडो फुटेज तपासल्यानंतर काही संशयित महिला आणि पुरुष पोलिसांच्या नजरेत आले. गुप्त खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्ह्याची पाळेमुळे थेट अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचली होती.

श्रीरामपुरातून उचलले अन्…

खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस पथकाने थेट अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर गाठले. सापळा रचून बाळासाहेब चंद्रभान राक्षे (वय ५५) आणि दिगंबर सुर्यभान दारकुंटे (वय ५६) या दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या दोघांना पोलिसांनी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागले. त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.

महिला पुढे, पुरुष बॅकअपला!

चौकशीत आरोपींनी धक्कादायक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लिलाबाई खंदारे आणि तिच्या साथीदार महिलेच्या मदतीने त्यांनी दिंडोरीत वृद्ध महिलेच्या गळ्यातील पोत चोरली होती. महिला चोरट्या गर्दीत चोरी करायच्या आणि पुरुष साथीदार त्यांना संरक्षण देत वाहनातून पसार व्हायचे, अशी त्यांची गुन्ह्याची पद्धत होती. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यासाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर कार आणि चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

या टोळीवर यापूर्वीही अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून, ते सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या अटकेमुळे आणखी अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ही कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, रघुनाथ शेगर तसेच पोउनि सुदर्शन बोडके, सुदर्शन आवारी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व दिंडोरी पोलिसांच्या पथकाने केली आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!