अंबड पोलिसांचा धडाका! नागरिकांना परत मिळाले हक्काचे १५ लाख; फिर्यादींच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू!

चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर मुद्देमाल परत, पोलिसांच्या कामगिरीने नागरिकांना मोठा दिलासा

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. ३० (प्रतिनिधी):चोरट्यांनी लंपास केलेली आपली कष्टाची कमाई आणि मौल्यवान वस्तू आता परत मिळणार नाहीत, या भावनेने खचलेल्या ८ नागरिकांसाठी आजचा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नव्हता. अंबड पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि केलेल्या कौतुकास्पद कामगिरीमुळे तब्बल १५ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत मिळाला. यावेळी आपला हक्काचा ऐवज परत घेताना अनेक फिर्यादींच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते, तर काहींनी पोलिसांचे तोंडभरून आभार मानले.

अंबड पोलीस ठाण्यात आज पोलीस उपायुक्त किशोर काळे यांच्या हस्ते या मुद्देमाल वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. चोरीला गेलेले सोन्याचे दागिने, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू परत मिळताच फिर्यादींच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद ओसंडून वाहत होता. एका क्षणात आपल्या आयुष्याची जमापुंजी गमावल्याचे दुःख विसरून त्यांनी नाशिक पोलिसांच्या कामगिरीला सलाम केला.

यावेळी बोलताना पोलीस उपायुक्त किशोर काळे म्हणाले, “गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करणे इतकेच आमचे काम नाही, तर नागरिकांची गेलेली मालमत्ता शोधून ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हेच आमचे खरे कर्तव्य आहे. नागरिकांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद हीच आमच्या कामाची खरी पोचपावती आहे.”

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, आणि सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन खैरणार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या कार्यक्रमात सपोनि के.टी. रौंदळे, दीपक बागुल, प्रताप गिरी, विलास पडोळकर, मसपोनि स्वप्नाली पलांडे यांच्यासह इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. अंबड पोलिसांच्या या तत्परतेमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!