गुन्हे शाखा युनिट-२ ‘ॲक्शन मोड’मध्ये; अवघ्या २४ तासांत दोन मोठ्या कारवाया यशस्वी.
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. ३०: शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट-२ च्या शूर पथकाने एका धडाकेबाज कारवाईत सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. खुनाचा प्रयत्न आणि तब्बल सहा मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये हवा असलेला कुख्यात आरोपी राजन उर्फ बबुवा आणि त्याचा साथीदार संतोष खंगाळ याला जेरबंद करण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५,३०,००० रुपये किमतीच्या १० मोटारसायकली जप्त करून शहरातील विविध पोलीस ठाण्यांमधील १० गुन्हे उघडकीस आणले आहेत.
पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप मिटके यांनी मोटारसायकल चोरांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेला दिलेल्या आदेशानंतर युनिट-२ चे पथक कामाला लागले होते. प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त बातमीदार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा माग काढण्यास सुरुवात केली.
असा लागला छडा: गुप्त बातमीदाराची ‘पक्की’ खबर
दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी, युनिट-२ चे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण आणि पोलीस हवालदार मनोज परदेशी यांना त्यांच्या विश्वासू बातमीदाराकडून एक ‘पक्की’ खबर मिळाली. एक इसम चोरीची रॉयल एनफिल्ड बुलेट विकण्यासाठी पाथर्डी फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच, क्षणाचाही विलंब न लावता पथकाने सापळा रचला. वासन टोयोटा शोरूमजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या संतोष अशोक खंगाळ (वय ३१) याला पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८०,००० रुपये किमतीची बुलेट जप्त करताच सातपूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा उलगडा झाला. पोलिसांनी खाक्या दाखवताच संतोष पोपटासारखा बोलू लागला आणि त्याच्या कबुलीवरून शहरातून चोरलेल्या आणखी ८ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.
मुख्य सूत्रधार ‘बबुवा’ अखेर जेरबंद
संतोषच्या चौकशीतून मुख्य सूत्रधार आणि खुनाच्या प्रयत्नातील सराईत गुन्हेगार राजन उर्फ बबुवा कनोजीया (वय २२) याचे नाव समोर आले. दुसऱ्याच दिवशी, ३० ऑगस्ट रोजी, बबुवा सिडकोतील संभाजी स्टेडियम परिसरात चोरीची मोटारसायकल घेऊन फिरत असल्याची अचूक माहिती पथकाला मिळाली. युनिट-२ च्या पथकाने सापळा रचून राजन उर्फ बबुवाला घेरले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून ४०,००० रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली.
पोलिसांच्या कामगिरीमुळे ‘या’ गुन्ह्यांचा उलगडा
या दोन आरोपींच्या अटकेमुळे सातपूर, भद्रकाली, पंचवटी, आडगाव, म्हसरूळ आणि नाशिक ग्रामीणमधील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यांतील एकूण १० मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे, आरोपी राजन उर्फ बबुवा हा अंबड पोलीस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यासह पंचवटी, आडगाव, म्हसरूळ, इंदिरानगर आणि उपनगर पोलीस ठाण्यांतील तब्बल ६ मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये ‘वॉन्टेड’ होता. त्याच्या अटकेमुळे अनेक गंभीर गुन्ह्यांची मालिका खंडित झाली आहे.
शूर पथकाचे सर्वत्र कौतुक
ही धाडसी आणि यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त श्री. किरणकुमार चव्हाण, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हेमंत तोडकर, सपोनि डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोउनि मुक्तारखान पठाण, सपोउनि गुलाब सोनार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पथकाने केली आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे नाशिककरांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून, पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.







