नाशिकमध्ये लाचखोर तलाठी गजाआड! फक्त एक हजार रुपयांसाठी स्वीकारली लाच, रंगेहाथ अटक!

सातबारा उताऱ्यावर नोंदीसाठी मागितली होती लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडाकेबाज कारवाई

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २९:- ऑगस्ट: शासकीय कामासाठी सर्वसामान्य नागरिकांकडून लाच उकळण्याची कीड किती खोलवर रुजली आहे, याचे धक्कादायक उदाहरण आज नाशिकमध्ये समोर आले. बहिणीच्या नावे असलेल्या प्लॉटची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी एका ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाकडून अवघ्या एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना चेहडी बुद्रुक येथील तलाठी गौरव शंकर दवंगे (वय ३१) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे संपूर्ण महसूल विभागात खळबळ उडाली आहे

या प्रकरणातील तक्रारदार हे एक ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांच्या बहिणीच्या मालकीचा चेहडी बुद्रुक येथे एक प्लॉट असून, त्याचे बक्षीसपत्र सातबारा उताऱ्यावर नोंदवून घेण्यासाठी ते तलाठी कार्यालयात गेले होते. हे त्यांचे कायदेशीर काम करून देण्याच्या मोबदल्यात, वर्ग-३ चा लोकसेवक असलेल्या तलाठी गौरव दवंगे याने आपल्या पदाचा गैरवापर करत दिनांक १९ ऑगस्ट रोजी तक्रारदाराकडे चक्क १००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.

शासकीय कामासाठी पैसे द्यावे लागत असल्याने संतापलेल्या आणि प्रामाणिक तक्रारदाराने या भ्रष्ट वृत्तीला कंटाळून थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक कार्यालय गाठले आणि आपली तक्रार नोंदवली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुवर्णा हांडोरे आणि त्यांच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचला.

आज, दिनांक २८ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास, ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने तलाठी कार्यालय, चेहडी बुद्रुक येथे जाऊन दवंगे याच्याकडे लाचेची रक्कम दिली. दवंगेने पंचांसमक्ष ही रक्कम स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. अवघ्या हजार रुपयांसाठी आपली शासकीय नोकरी आणि प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या या लाचखोर तलाठ्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

याप्रकरणी गौरव दवंगे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही यशस्वी कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि  सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक सुवर्णा हांडोरे आणि त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी व पोलीस नाईकविलास निकम यांनी अत्यंत शिताफीने पार पाडली. या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!