‘तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझे लग्न होऊ देणार नाही’; लग्नाचे दोन प्रस्ताव मोडल्याने उचलले टोकाचे पाऊल
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २८: प्रेमसंबंधातून विवाहित प्रियकराकडून मिळणाऱ्या त्रासाला आणि धमकीला कंटाळून पंचवटीतील एका २२ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची काळजाचा थरकाप उडवणारी घटना उघडकीस आली आहे. जागृती सचिन गोसावी असे या मृत तरुणीचे नाव असून, याप्रकरणी तिचा भाऊ रुद्राक्ष गोसावी याच्या फिर्यादीवरून भावेश वाघ नावाच्या तरुणाविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंचवटीतील अमृतधाम परिसरातील गोपाळनगर येथे राहणाऱ्या जागृती गोसावी (वय २२) हिचे बिडीकामगार नगरात सलुनचे दुकान असलेल्या भावेश वाघ याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही दिवसांनी भावेश हा विवाहित असल्याचे जागृतीला समजले. हा मोठा धक्का बसल्याने तिने भावेशसोबतचे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला.
परंतु, जागृतीचा हा निर्णय भावेशला मान्य नव्हता. त्याने तिचा पिच्छा पुरवत तिला त्रास देण्यास सुरुवात केली. “तू माझ्याशीच लग्न कर, नाहीतर मी तुझे लग्न कुठेच होऊ देणार नाही,” अशी धमकी तो तिला वारंवार देत होता. केवळ धमकी देऊन तो थांबला नाही, तर त्याने यापूर्वी जागृतीचे दोन ठिकाणी जमलेले लग्न मोडले होते. सध्या तिचे तिसऱ्या ठिकाणी लग्न जमले होते आणि तेही मोडण्यासाठी तो प्रयत्न करत होता.
सततच्या या त्रासाला आणि बदनामीच्या भीतीला जागृती कंटाळली होती. अखेर, मंगळवारी (दि. २६) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तिने राहत्या घरी हॉलमधील छताच्या पंख्याला स्कार्फच्या साहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योती आमणे, सुनिल पवार, आणि तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत तरुणीचा भाऊ रुद्राक्ष गोसावी (वय १९) याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भावेश वाघ याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०८ आणि ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







