मुख्य सूत्रधारासह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या; आडगाव पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्हे दाखल, परिसरात प्रचंड दहशत
लाल 🚨 दिवा-नाशिक-दि.२४:-नांदूर नाका, आमच्या प्रतिनिधीकडून: पोळ्याच्या सणाच्या दिवशी नांदूर नाका परिसरात एका किरकोळ वादाने इतके भीषण रूप धारण केले की, पाहता पाहता त्याचे रूपांतर सशस्त्र टोळीयुद्धात झाले. सुमारे २५ ते ३० जणांच्या सशस्त्र जमावाने दोन तरुणांवर “जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने” केलेला जीवघेणा हल्ला आणि त्यातील एकाचा चॉपरने वार करून कोथळा बाहेर काढल्याच्या क्रूर घटनेने संपूर्ण नाशिक हादरले आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य सूत्रधारासह पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
हकीगत, जशी फिर्यादीने सांगितली:
याप्रकरणी आकाश राजू धोत्रे (वय २९, रा. जनार्दन नगर) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, दिनांक २२ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास त्यांचा भाऊ सनी राजू धोत्रे याचा निमसे कुटुंबातील दोन मुलांसोबत किरकोळ वाद झाला होता.
याच वादाचा वचपा काढण्यासाठी, उद्धव उर्फ बाबा बाबुराव निमसे याने शिवीगाळ व दमदाटी करत मोठा जमाव जमवून त्यांना चिथावणी दिली. त्यानंतर सायंकाळी सव्वासहा ते सातच्या दरम्यान पवन निमसे, संतोष मते, सचिन दिंडे, स्वप्निल बागुल, सुधीर निमसे, अक्षय पगार, मेघराज जोजारे, गणेश निमसे, रोशन जगताप, सुमित हांडोरे यांच्यासह इतर १० ते १५ अनोळखी इसमांनी लाकडी व लोखंडी दांडे, चाकू आणि चॉपरसारखी जीवघेणी हत्यारे घेऊन धोत्रे कुटुंबीयांवर हल्ला चढवला.
क्रौर्याची परिसीमा: एकाचा काढला कोथळा बाहेर!
या सशस्त्र जमावाने फिर्यादीचा आतेभाऊ अजय दत्तू कुसाळकर (वय २७) आणि भाऊ राहुल संजय धोत्रे यांचा पाठलाग केला. अजय कुसाळकर याला त्याच्या घरामागे गाठून सुमित हांडोरे याने चॉपरने तर इतरांनी दांड्यांनी मारहाण करून त्याच्या डोक्यात, हातात आणि पायावर गंभीर जखमा केल्या.
त्यानंतर या जमावाने आपला मोर्चा फिर्यादीचा भाऊ राहुल संजय धोत्रे याच्याकडे वळवला. दिंडे मळा परिसरात त्याला गाठून सुमित हांडोरे याने त्याच्या पोटाच्या उजव्या बाजूस चॉपरने इतका भयंकर वार केला की, त्याचा कोथळा बाहेर आला. इतरांनीही त्याच्या डोक्यात मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले.
पोलिसांची वेगवान कारवाई; पाच जण अटकेत!
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. फिर्यादी आकाश धोत्रे यांच्या तक्रारीवरून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 266/2025 अन्वये आरोपींविरुद्ध **भारतीय न्याय संहिता कलम 109, 189(2), 189(4), 190, 191, 192, 351(2), 351(3), 352 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी रात्रीतच धडक कारवाई करत आरोपी मेघराज सुनिल जोजारे, गणेश राजाभाऊ निमसे, रोशन लक्ष्मण जगताप, अक्षय अशोक पगार आणि सुधीर उर्फ गोटीराम माधवराव निमसे या पाच जणांना दिनांक २३ ऑगस्ट रोजी पहाटे अटक केली आहे. इतर फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या घटनेमुळे नांदूर नाका परिसरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडे करत आहेत.







