खंडणीखोर ‘गग्गा’च्या मुसक्या आवळल्या! LCB च्या थरारक कारवाईत गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसे जप्त!

इगतपुरीतील खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला वाडीवऱ्हे परिसरातून अटक, परिसरात खळबळ.

लाल 🚨 दिवा-नाशिक | आमच्या विशेष प्रतिनिधीकडून  इगतपुरी तालुक्यात दहशत माजवणाऱ्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराईत गुन्हेगार पुरुषोत्तम गिरी उर्फ ‘गग्गा’ याच्या अखेर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) धाडसी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. घोटी-सिन्नर रोडवर सापळा रचून केलेल्या या थरारक कारवाईत त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे आणि एक धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

नाशिक ग्रामीण पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इगतपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला कुख्यात गुन्हेगार पुरुषोत्तम संजय गिरी उर्फ गग्गा (रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी) हा वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन हद्दीतील घोटी-सिन्नर रोडवरील एस.एम.बी.टी. हॉस्पिटल परिसरात संशयास्पदरित्या फिरत आहे. या माहितीच्या आधारे LCB च्या पथकाने तात्काळ सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच गग्गा पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र LCB च्या पथकाने अत्यंत शिताफीने त्याला घेरून जेरबंद केले.

झडतीत आढळला शस्त्रसाठा

पोलिसांनी गग्गाची झडती घेतली असता त्यांच्याही भुवया उंचावल्या. त्याच्या कंबरेला एक गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) आणि खिशात दोन जिवंत काडतुसे आढळून आली. इतकेच नव्हे, तर त्याच्याजवळ एक धारदार लोखंडी कोयताही सापडला. यावरून तो कोणत्यातरी मोठ्या गुन्ह्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी तात्काळ सर्व मुद्देमाल जप्त करून त्याच्यावर वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

सराईत गुन्हेगार आणि दहशतीचे साम्राज्य

अटक करण्यात आलेला गग्गा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. खंडणी, मारामारी, दमदाटी अशा गुन्ह्यांमुळे परिसरात त्याची मोठी दहशत होती. इगतपुरीतील खंडणीच्या गुन्ह्यात तो फरार असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्या अटकेमुळे अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रवींद्र मगर यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार प्रवीण काकड, संतोष दोंदे, योगिता काकड, मयूर कांगणे, नवनाथ शिरोळे आणि तुपलोंढे यांनी ही धाडसी कारवाई यशस्वी केली. या कामगिरीबद्दल संपूर्ण पोलीस दलाचे कौतुक होत आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!