आंतरराज्यीय ‘वाईनशॉप’ चोराच्या अखेर मुसक्या आवळल्या!

कोण आहे हा ‘रामनिवास गुप्ता’? ज्याने महाराष्ट्र आणि गुजरात पोलिसांच्या नाकात दम आणला होता!

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. १९ ऑगस्ट:महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये तब्बल ४० पेक्षा जास्त दुकानफोड्या करून पोलिसांच्या नाकीनऊ आणणाऱ्या एका अट्टल आणि सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाला अखेर यश आले आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल अशा रीतीने, तब्बल ३०० किलोमीटरच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत, मुसळधार पावसात सापळा रचून या महाचोराला ठाण्यातील मुंब्रा येथून बेड्या ठोकण्यात आल्या. रामनिवास उर्फ राम मंजु गुप्ता (वय ३७) असे या सराईत चोराचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे नाशिक शहरातील वाईनशॉप फोडीचे चार मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत.

असा लागला छडा...

या थरारक कारवाईची सुरुवात झाली नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या एका वाईनशॉप फोडीच्या गुन्ह्यामुळे. दिनांक १२ जुलै रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास एका बर्गमॅन मोपेडवरून आलेल्या चोराने दुकान फोडून पळ काढला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत या चोराचा माग काढायला सुरुवात केली. सुरुवातीला नाशिक ते पडघा असा ११० किलोमीटरच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी अक्षरशः पिंजून काढले, पण आरोपी हाती लागला नाही.

पोलिसांचा तपास सुरू असतानाच, दिनांक ६ ऑगस्ट रोजी उपनगर आणि गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा त्याच पद्धतीने दोन वाईनशॉप फोडल्याच्या घटना घडल्या. चोराची हिंमत पाहून पोलीस पथक अधिकच सतर्क झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुन्हा एकदा कंबर कसली. यावेळी नाशिक ते थेट मुंब्रा असा तब्बल १९० किलोमीटरच्या मार्गावरील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज दिवस-रात्र एक करून तपासण्यात आले आणि अखेर आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.

मुसळधार पावसात सिनेस्टाईल पाठलाग !

आरोपी रामनिवास गुप्ता हा मुंब्रा परिसरात फिरत असल्याची पक्की खबर गुप्त बातमीदाराकडून मिळताच, गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तातडीने ठाण्याकडे रवाना झाले. मुसळधार पावसामुळे शोध घेणे आव्हानात्मक असतानाही, पोलिसांनी जीवाची पर्वा न करता आरोपीचा शोध सुरू ठेवला. अखेर, मुंब्रा येथील रेतीबंदर उड्डाणपुलाजवळ शिळफाटा रस्त्यावर आरोपी त्याच्या बर्गमॅन मोपेडसह दिसताच, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ६० हजार रुपये किमतीची मोपेड गाडी जप्त करण्यात आली आहे.

पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला !

ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी रामनिवास गुप्ता पोपटासारखा बोलू लागला. त्याने नाशिक शहरातील नाशिकरोड, उपनगर, गंगापूर येथील वाईनशॉप फोडल्याची कबुली दिली. इतकेच नाही, तर ठाणे जिल्ह्यातील पडघा येथील गुन्हाही त्यानेच केल्याचे मान्य केले. हा केवळ एक सामान्य चोर नसून, त्याच्यावर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोबाईल दुकान, वाईनशॉप आणि चारचाकी वाहन चोरीचे ४० पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी सपोनि. हेमंत तोडकर, सपोनि. डॉ. समाधान हिरे, सपोउपनि. शंकर काळे, बाळू शेळके, पोहवा. मनोहर शिंदे, सुनील आहेर, प्रकाश महाजन आणि प्रविण वानखेडे यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईत तांत्रिक विश्लेषण शाखेची (TAW) मदत मोलाची ठरली.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!