आडगाव पोलिसांचा दणका! डिझेल चोरणारी अट्टल गुन्हेगारांची टोळी गजाआड!

घटनास्थळी सोडून गेलेली एर्टिगा कार ठरली महत्त्वाचा दुवा; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१८:-शहरात वाढत्या चोऱ्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी दिलेल्या आदेशानंतर नाशिक पोलीस दल सक्रिय झाले आहे. आडगाव पोलिसांनी एक मोठी कारवाई करत, ट्रान्सपोर्ट टर्मिनल परिसरातून डिझेल चोरणाऱ्या एका अट्टल टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. घटनास्थळी चोरट्यांनी सोडून दिलेली एर्टिगा कार या गुन्ह्याच्या तपासात अत्यंत महत्त्वाची ठरली, ज्याच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण टोळीलाच बेड्या ठोकल्या.

काय आहे नेमके प्रकरण?

दिंडोरी रोड येथील रहिवासी आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिक श्री. संतोष कचरू भागवत यांनी दि. ११/०८/२०२५ रोजी आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या मालकीचा ट्रक आडगाव शिवारातील ट्रान्सपोर्ट टर्मिनल येथे पार्क केलेला असताना, अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्यातून मोठ्या प्रमाणात डिझेल चोरून नेले होते. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) आणि ३ (५) नुसार गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

एका गाडीने उघड केला संपूर्ण गुन्हा !

गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता, त्यांना तिथे एक बेवारस एर्टिगा कार संशयास्पदरीत्या आढळून आली. हाच धागा पकडून पोलीस हवालदार शेख, दादासाहेब वाघ, निलेश काटकर आणि त्यांच्या पथकाने तपास सुरू केला. गाडीच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी थेट निफाड गाठून प्रसाद दत्तात्रय वाडेकर (रा. गणेशनगर, राहता) याला शिताफीने ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या प्रसादला पोलिसांनी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या इतर साथीदारांची नावेही उघड केली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी अमोल अविनाश कुंदे, धनंजय अविनाश कुंदे (दोघेही रा. एकरुखे, ता. राहता), अजय राजू भोसले (रा. गणेशवाडी, शिर्डी) आणि बाबासाहेब दगडू राऊत (रा. एकरुखा, राहता) या चौघांनाही वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली.

लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी या टोळीकडून गुन्ह्यासाठी वापरलेली तीन लाख रुपयांची एर्टिगा कार, चोरलेले ५० लिटर डिझेल, डिझेल भरण्यासाठी वापरलेले पाच रिकामे कॅन, एक सॅमसंग मोबाईल आणि डिझेल काढण्यासाठी वापरलेली प्लॅस्टिकची नळी असा एकूण ३,१३,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यशस्वी कामगिरी करणारी टीम

ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-१) श्रीमती मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त (पंचवटी विभाग) श्रीमती संगीता निकम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, निलेश काटकर आणि पोलीस कॉन्स्टेबल भुजबळ, पडोळ, अक्षय गोसावी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, पोलीस त्या दिशेने अधिक तपास करत आहेत.ली एर्टिगा कार ठरली महत्त्वाचा दुवा; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!