नाशिकमध्ये हायप्रोफाईल फसवणूक! मुंबईच्या महिलेकडून व्यावसायिकाला तब्बल १ कोटी १ लाखांचा गंडा; उत्तराखंडमधील बनावट गेस्ट हाऊसचा बनाव!

बनावट ई-स्टॅम्प पेपर दाखवून विश्वास संपादन; इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लाल 🚨 दिवा नाशिक, दि. १७: शहरात एका हायप्रोफाईल फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून, मुंबईच्या एका महिलेने नाशिकमधील एका नामांकित व्यावसायिकाला तब्बल एक कोटी एक लाख रुपयांना गंडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तराखंड राज्यातील एका गेस्ट हाऊसची मालकी नसतानाही ती आपलीच असल्याचे भासवून आणि भारत सरकारचा बनावट ई-स्टॅम्प पेपर वापरून हा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी धीरज भवरलाल काबरा (वय ५२, रा. श्रीजी सिनर्जी अपार्टमेंट, गोविंद नगर) हे एक प्रतिष्ठित व्यावसायिक आहेत. त्यांची ओळख मुंबईतील भांडुप येथे राहणाऱ्या अरुणा श्रीकृष्ण मोरे या महिलेशी झाली. अरुणा मोरे हिने उत्तराखंड राज्यातील रूडकी गावात ‘साबरी रजवी गेस्ट हाऊस’ नावाची मोठी प्रॉपर्टी आपल्या मालकीची असल्याचे काबरा यांना सांगितले. ही प्रॉपर्टी विकायची असल्याचे सांगून तिने काबरा यांच्यासमोर ४ कोटी ६५ लाख रुपयांचा प्रस्ताव ठेवला.

आरोपी अरुणा मोरे हिने आपल्या बोलण्याने आणि कागदपत्रांच्या बनावट खेळाने काबरा यांचा पूर्ण विश्वास संपादन केला. तिने भारत सरकारची छापील मोहोर असलेला हुबेहूब बनावट ई-स्टॅम्प पेपर तयार करून त्यावर विसार पावती (बयाणा रसीद) बनवली. हा व्यवहार पक्का करण्यासाठी ऑगस्ट २०१९ ते १६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील हॉटेल तपस्वी येथे बैठका झाल्या. याच हॉटेलमध्ये काबरा यांनी अरुणा मोरे हिला व्यवहारापोटी सुरुवातीला १५ लाख रुपये रोख दिले.

यानंतर, अरुणा मोरे हिने वेळोवेळी काबरा यांच्याकडून आणखी ८६ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. असे एकूण १ कोटी १ लाख रुपये स्वीकारल्यानंतर तिने बनावट नोटरी कागदपत्रे तयार करून काबरा यांना दिली. मात्र, बराच काळ उलटूनही पुढील प्रक्रिया होत नसल्याने काबरा यांना संशय आला. त्यांनी जेव्हा प्रॉपर्टीची खातरजमा केली, तेव्हा ती प्रॉपर्टी अरुणा मोरे हिच्या मालकीचीच नसल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.

आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धीरज काबरा यांनी तात्काळ इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अरुणा श्रीकृष्ण मोरे हिच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३३६ (२), ३३८, ३३६ (३) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी स्वतः लक्ष घातले असून,  या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपी महिला अरुणा मोरे सध्या फरार असून पोलीस पथक तिचा कसून शोध घेत आहे. या हायप्रोफाईल फसवणुकीमागे आणखी कोणी सूत्रधार आहेत का, याचाही पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे नाशिकच्या व्यावसायिक वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!