नाशिकच्या ‘सावतानगर पॅटर्न’चा राज्यभर डंका! एकाच अभ्यासिकेतून १२२ भावी अधिकारी घडले!

‘भ्रष्टाचारापासून दूर राहा, व्यसनमुक्त भारताचे स्वप्न साकार करा’ – ना. गिरीश महाजनांचा तरुणाईला कानमंत्र; जामनेरमध्येही उभारणार भव्य अभ्यासिका

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१६:- (विशेष प्रतिनिधी):एकीकडे स्पर्धा परीक्षांमधील यशाचा टक्का घसरत असल्याची ओरड होत असताना, नाशिकच्या सिडकोतील सावतानगर येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अभ्यासिकेने मात्र यशाचा नवा इतिहास रचला आहे. २०२५ या एकाच वर्षात तब्बल १२२ विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध परीक्षांमध्ये गगनभेदी यश मिळवून राज्याच्या प्रशासकीय सेवेत आपले स्थान निश्चित केले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आयोजित केलेल्या दिमाखदार सोहळ्यात राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी ‘स्पर्धा परीक्षांमधून मिळवलेली नोकरी हा सर्वोच्च आनंद आहे,’ असे गौरवोद्गार काढले.

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधाकर बडगुजर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभ्यासिकेच्या प्रांगणात आयोजित या नेत्रदीपक सत्कार सोहळ्यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बबनराव घोलप, लक्ष्मण सावजी, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ना. गिरीश महाजन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “केवळ नोकरी मिळवून थांबू नका, तर स्वतःची एक चांगली प्रतिमा निर्माण करा. भ्रष्टाचाराला थारा देऊ नका आणि ‘मी व्यसन करणार नाही’ अशी शपथ घ्या. तुमचे करिअर उद्ध्वस्त होईल, असे कोणतेही कृत्य तुमच्या हातून घडू देऊ नका,” असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला.

जामनेरमध्येही ‘नाशिक पॅटर्न’

नाशिकमधील सुधाकर बडगुजर आणि बाळासाहेब सानप यांच्या अभ्यासिकेच्या उत्कृष्ट मॉडेलने प्रभावित होऊन, आपल्या जामनेर शहरातही अशीच भव्य आणि सुसज्ज अभ्यासिका उभारणार असल्याची घोषणा ना. महाजन यांनी करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

राजकारण्यांनाही मोलाचा सल्ला

यावेळी ना. महाजन यांनी केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर राजकीय कार्यकर्त्यांनाही मोलाचा सल्ला दिला. ते म्हणाले, “राजकारणाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही. त्यामुळे आपण सर्वांनी जमिनीवर राहून राजकारणासोबत समाजकारणही केले पाहिजे.” आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढली काय किंवा युतीत, ‘१०० पार’चा नारा कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यशाचा चढता आलेख!

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सुधाकर बडगुजर यांनी अभ्यासिकेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, “२०१६ ते २०२० पर्यंत दरवर्षी २० अधिकारी घडवणाऱ्या या अभ्यासिकेने २०२४ मध्ये ४८ आणि आता २०२५ मध्ये थेट १२२ अधिकाऱ्यांचा टप्पा गाठून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.” या यशाचे सर्व श्रेय त्यांनी विद्यार्थ्यांची मेहनत आणि मार्गदर्शकांना दिले. ना. गिरीश महाजन यांच्या कुशल नियोजनामुळेच आगामी कुंभमेळा यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी काही यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून अभ्यासिकेमुळे आपले आयुष्य कसे बदलले, हे सांगितले. या अभूतपूर्व यशामुळे नाशिकच्या ‘सावतानगर पॅटर्न’ची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!