गुन्हेशोध पथकाची धडाकेबाज कामगिरी; मूर्तीसह १७ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी जेरबंद!
लाल 🚨 दिवा-नाशिकरोड, दि. १४ ऑगस्ट: शहरात खळबळ माजवून देणाऱ्या एका अत्यंत संवेदनशील प्रकरणात नाशिकरोड पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी करत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पितळी मूर्तीची चोरी करणाऱ्या धाडसी चोराला गजाआड केले आहे. दिवसाढवळ्या घरात घुसून मूर्तीसह रोख रक्कम आणि मोबाईल लंपास करणाऱ्या गौरव आनंद बाविस्कर (वय २०) याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून, त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी बाराच्या सुमारास जेलरोड परिसरातील बन्सी बंगल्यात राहणाऱ्या श्रीमती सुशिला बन्सीलाल चंद्रमोरे यांच्या घरात ही चोरीची घटना घडली. घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोराने घरात प्रवेश केला आणि देव्हाऱ्यात असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अंदाजे दीड किलो वजनाची पितळी मूर्ती, एक मोबाईल फोन आणि ५००० रुपयांची रोकड चोरून पोबारा केला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

असा लागला छडा!
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र सपकाळे यांनी तात्काळ गुन्हेशोध पथकाला तपासाचे चक्र गतिमान करण्याचे आदेश दिले. पथक आरोपीचा शोध घेत असतानाच, पोलीस हवालदार विशाल पाटील आणि पोलीस अंमलदार महेंद्र जाधव यांना त्यांच्या गुप्त खबऱ्याकडून एक पक्की खबर मिळाली. काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक तरुण चोरीची मूर्ती विकण्यासाठी बिटको चौकात येणार असल्याची माहिती मिळताच पोलीस पथक सतर्क झाले.
पोलिसांनी रचला सापळा अन् चोर अडकला जाळ्यात!
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बिटको चौकात सापळा रचला. संशयित गौरव बाविस्कर त्या ठिकाणी येताच, पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे चोरीला गेलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पितळी मूर्ती, मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल फोन आणि ५००० रुपयांची रोकड असा एकूण १७,००० रुपयांचा मुद्देमाल सापडला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपीला बेड्या ठोकल्या.
कामगिरीचे सर्वत्र कौतुक!
ही कौतुकास्पद कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त श्री. किशोर काळे, आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वात गुन्हेशोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, विष्णू गोसावी, पोलीस अंमलदार महेंद्र जाधव, सागर आडणे, अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या चमकदार कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विशाल पाटील आणि महेंद्र जाधव करत आहेत.







