फरार आरोपी अखेर जेरबंद, पण कारवाईचा बळी कनिष्ठांनाच!

मोठ्यांना’ अभय, ‘छोट्यांवर’ निलंबनाची सुरी; पोलीस दलातील परंपरेचे पुन्हा दर्शन!

कारवाईचा फार्स: हलगर्जीपणाचा ठपका ठेवत एक पोलीस कर्मचारी निलंबित; वरिष्ठांची मात्र पाठराखण?

दलातच कुजबुज: सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या देखरेखीखाली घटना, मग जबाबदारी शिपायांवरच का?

ज्वलंत सवाल: आरोपीला पकडण्याचे श्रेय सर्वांचे, मग अपयशाचे खापर फक्त कनिष्ठांवर का फोडले?

लाल 🚨 दिवा नाशिक,१२:- (विशेष प्रतिनिधी):नाशिक पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या पवननगर पोलीस चौकीतील पलायननाट्यावर अखेर पडदा पडला आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून फरार झालेल्या पोक्सो प्रकरणातील क्रूरकर्मा आरोपी अतुल तुंबडे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. या यशामुळे पोलिसांवरील टीकेची धार काहीशी कमी झाली असली, तरी या प्रकरणानंतर झालेल्या कारवाईमुळे पोलीस दलातच एका नव्या वादाला आणि गंभीर चर्चेला तोंड फुटले आहे. आरोपी पळून जाण्याच्या अपयशाची जबाबदारी केवळ एक कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर ढकलून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना मात्र ‘क्लीन चिट’ देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप दबक्या आवाजात होऊ लागला आहे.

असा सापडला जाळ्यात!

आरोपी अतुल तुंबडे फरार झाल्याने पोलीस दलाची मोठी नाचक्की झाली होती. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानंतर शेकडो पोलिसांची फौज त्याच्या मागावर होती. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, आरोपी ओझर परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून, अत्यंत नाट्यमय रीतीने पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. तो जिल्हा सोडून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला पकडले.

कारवाईचा बडगा आणि वादाची ठिणगी!

आरोपीला पकडण्यात यश मिळताच, दुसरीकडे या पलायन प्रकरणातील हलगर्जीपणासाठी जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली. अपेक्षेप्रमाणे, या प्रकरणाचा ठपका ठेवत तात्काळ एक पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मात्र, या कारवाईमुळेच आता पोलीस दलात आणि नागरिकांमध्येही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत:

वरिष्ठ अधिकारी नामानिराळे कसे?

ज्यावेळी आरोपी अतुल तुंबडे पोलीस चौकीतून पळाला, त्यावेळी संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा हा सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सविता उंडे यांच्या देखरेखीखाली सुरू होता. कोणत्याही कामाची अंतिम जबाबदारी ही पथकप्रमुखाची किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याची असते. मग या प्रकरणात केवळ त्यांच्या हाताखालील एक कर्मचाऱ्यांनाच ‘बळीचा बकरा’ का बनवले जात आहे?

जबाबदारी झटकण्याचा प्रकार?

एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या उपस्थितीत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कामकाज सुरू असताना आरोपी पळून जातो, ही बाब अत्यंत गंभीर आहे. यातून वरिष्ठ अधिकाऱ्याचे पर्यवेक्षणावर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होते. असे असताना, केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून वरिष्ठ अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत का? ‘मोठ्यांना’ वाचवून ‘छोट्यांचा’ बळी देण्याची पोलीस दलातील जुनी परंपराच या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे का?

श्रेय सर्वांचे, अपयश एकाचे ?

आरोपीला पकडल्यानंतर संपूर्ण पोलीस दलाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचे श्रेय घेतले. मात्र, तो पळून गेला त्या अपयशाचे खापर केवळ एक कर्मचाऱ्यांवर फोडणे, हा कोणता न्याय? असा सवाल आता पोलीस दलातील कर्मचारीच खासगीत विचारू लागले आहेत.

या कारवाईमुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. आरोपीला पकडल्याबद्दल पोलिसांचे कौतुक होत असले तरी, जबाबदारी निश्चित करताना होणारा हा उघड भेदभाव नागरिकांच्याही नजरेतून सुटलेला नाही. आता या प्रकरणाची निःपक्षपाती चौकशी होऊन, खऱ्या अर्थाने जबाबदार असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!