मालेगावात वाहनचोरांच्या साम्राज्याला सुरुंग; पोलिसांच्या एका कारवाईने १४ गुन्हे उघड!
लाल 🚨 दिवा-मालेगाव,दि.१२:- (क्राईम रिपोर्टर): नाशिक जिल्ह्यासह आसपासच्या परिसरात अक्षरशः थैमान घालून नागरिकांची झोप उडवणाऱ्या एका कुख्यात आंतरजिल्हा वाहनचोर टोळीच्या मुसक्या आवळण्यात पवारवाडी पोलिसांना अखेर यश आले आहे. एखाद्या थरारपटालाही लाजवेल अशा अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी कारवाईत पोलिसांनी या टोळीचा केवळ पर्दाफाशच केला नाही, तर त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल ३० मोटरसायकली आणि १ ट्रॅक्टर असा एकूण २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हेगारी विश्वाला मोठा हादरा दिला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या वाहनचोरीच्या घटनांनी पोलीस दलाची डोकेदुखी वाढवली होती. पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे थेट आदेश दिल्यानंतर पवारवाडी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. राहुल खताळ यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी अक्षरशः रात्रंदिवस एक केले होते. तपासाची चक्रे वेगाने फिरत असतानाच, एका गुप्त खबऱ्याने दिलेल्या टीपमुळे पोलिसांच्या हाती एक मोठा धागादोरा लागला.
याच माहितीच्या आधारे पोलिसांनी एका मोठ्या ऑपरेशनची आखणी केली आणि संवदगाव फाट्यावर अत्यंत शिताफीने सापळा रचला. पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकलेल्या शहेजाद सैयद एकबाल आणि शेख युसुफ शेख अयुब या दोघांनाही सुरुवातीला आपण निरपराध असल्याचा आव आणला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्यांचा हा आव गळून पडला आणि ते पोपटासारखे बोलू लागले.
त्यांनी केवळ आपला गुन्हा कबूल केला नाही, तर आपल्या संपूर्ण टोळीचा आणि त्यांच्या कारनाम्यांचा पाढाच वाचला. त्यांचे धागेदोरे केवळ मालेगावपुरते मर्यादित नसून नाशिक शहर, निफाड, चांदवड, कळवण ते थेट जळगाव जिल्ह्यापर्यंत पसरले होते. या टोळीने विविध ठिकाणांहून तब्बल ३० मोटरसायकली आणि एक ट्रॅक्टर लंपास केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या साथीदारांनाही गजाआड केले असून, या कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांमधील तब्बल १४ गुन्हे उघडकीस आले आहेत.
या यशस्वी ऑपरेशनचे शिल्पकार ठरलेल्या पोलीस निरीक्षक श्री. राहुल खताळ आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. या धडक कारवाईने वाहनचोर टोळ्यांचे धाबे दणाणले असून, परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.







