शहरात ‘अदृश्य’ गुन्हा! पाच लाखांची तोडपाणी झाली, पण साक्षीदार कोणीच नाही!
लाल 🚨 दिवा नाशिक,दि.११:-आपला विशेष प्रतिनिधी, क्राईम डेस्क, शहरात कायद्याचे राज्य आहे की ‘अर्थ’पूर्ण समन्वयाचे, हा प्रश्न आता उघडपणे विचारला जाऊ लागला आहे. निमित्त ठरले आहे. एका गाजलेल्या ‘संयुक्त’ कारवाईचे. या कारवाईत प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त केल्याचा दावा दोन्ही विभागांनी केला आहे. पण पडद्यामागे एक असा सस्पेन्स थ्रिलर घडला आहे, जिथे कायद्याच्या पुस्तकातील कलमे फिकी पडली आणि पाच लाखांच्या ‘प्रसादाने’ सर्व पापांचे क्षालन झाले. विशेष म्हणजे, ही ‘महाआरती’ कोणीही पाहिली नाही!
नाट्याचा पहिला अंक: समन्वयाचा देखावा
एका वसाहतीतील दुकानावर एकाच वेळी दोन गाड्या धडकल्या. अवैध धंद्यांविरोधात ‘एकजुटीने’ लढा देत असल्याचा संदेश या कारवाईतून दिला जाणार होता. गोदामाचे शटर उघडले गेले, आतमध्ये गुटख्याचा खच पडलेला होता. कॅमेऱ्याचे फ्लॅश चमकले, पंचनाम्याला सुरुवात झाली. इथपर्यंत सर्व काही ‘प्लॅन’नुसार सुरू होते.
नाट्याचा दुसरा अंक: पडद्यामागील ‘अर्थ’शास्त्र
ज्यावेळी कनिष्ठ कर्मचारी आणि पंचनाम्याच्या कागदी घोडे नाचवण्यात व्यस्त होते, त्याचवेळी गोदामाच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात खरा ‘खेळ’ सुरू झाला होता. गुटखा माफिया, दलातील एक ‘वरिष्ठ’ आणि प्रशासनातील एक ‘जाणकार’ अधिकारी यांच्यात नजरेतूनच एक बैठक पार पडली.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशासनाच्या अधिकाऱ्याने कायद्याचा बडगा उगारत आयुष्यभर तुरुंगात सडण्याची भीती घातली, तर पोलीस अधिकाऱ्याने ‘रोजच्या त्रासातून कायमची सुटका’ देण्याचे आश्वासन दिले. या भीती आणि आश्वासनाच्या मधला मार्ग होता ‘तोडपाणी’.
बोलणी सुरू झाली आणि आकडा ठरला पाच लाख! पण ही रक्कम कोणी मोजली नाही, कोणी स्वीकारली नाही. हा एक ‘म्युच्युअल फंड’ होता, ज्यात दोघांचीही गुंतवणूक आणि दोघांचाही फायदा होता. हा व्यवहार इतक्या सफाईने झाला की, जणू काही वाऱ्याच्या झुळुकेसोबत पाच लाखांची रक्कम आली आणि ‘संयुक्त’पणे दोन्ही विभागांच्या ‘तिजोरीत’ जमा झाली.
अनुत्तरित प्रश्नचिन्हे:
1.संयुक्त कारवाई, संयुक्त तोडपाणी? या प्रकरणात पाच लाखांची माया नेमकी कोणाच्या खिशात गेली? प्रशासन यांच्यात या ‘प्रसादाचे’ वाटप कसे झाले? की ही एकाच अदृश्य हाताने केलेली किमया होती?
2. पांढऱ्या कोटावर डाग?अन्न आणि आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करणारा विभागच जर अशा ‘अर्थ’पूर्ण व्यवहारात सामील असेल, तर नागरिकांच्या आरोग्याची हमी कोण घेणार?
3. पुरावा कुठे आहे? ही तोडपाणी झाल्याचे कोणी पाहिले नाही, कोणी कबूल केले नाही. मग गोदामातील करोडोंच्या मालापैकी केवळ काही लाखांचा माल जप्त करून बाकीचा माल ‘हवेत’ कसा विरघळला?
4. समन्वयाचा नवा अध्याय?यापुढे शहरात होणाऱ्या ‘संयुक्त’ कारवायांकडे नागरिकांनी कायद्याची अंमलबजावणी म्हणून पाहावे की ‘संयुक्त वसुली मोहीम’ म्हणून?
सध्या दोन्ही विभाग कारवाईच्या यशाचे श्रेय घेण्यात मग्न आहेत, तर गुटखा माफिया पुन्हा एकदा आपला व्यवसाय थाटात सुरू करण्याच्या तयारीत आहे. कारवाई झाली, कागदपत्रे रंगली, पण पाच लाखांचा तो ‘अदृश्य’ व्यवहार मात्र एका अशा गूढ कथेसारखा मागे राहिला आहे, जी सगळ्यांना माहीत आहे, पण जिचा साक्षीदार कोणीच नाही.







