भेसळखोरांचे धाबे दणाणले! सणासुदीत भेसळ केल्यास थेट परवाने रद्द; मंत्री नरहरी झिरवाळांचा अल्टीमेटम

‘सण महाराष्ट्राचा – संकल्प अन्न सुरक्षेचा’ मोहिमेचा नाशिकमधून धडाकेबाज शुभारंभ

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. ११ (वार्ताहर):सणासुदीच्या तोंडावर मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीचा धोका लक्षात घेता, अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कंबर कसली आहे. भेसळखोरांना जरब बसवण्यासाठी थेट अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनीच मैदानात उतरत ‘सण महाराष्ट्राचा – संकल्प अन्न सुरक्षेचा’ या राज्यव्यापी मोहिमेचा नाशिकमधून धडाकेबाज शुभारंभ केला. “जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांची गय केली जाणार नाही, भेसळ आढळल्यास थेट आस्थापनांचे परवाने रद्द करा,” अशा कडक शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

ऑगस्ट महिन्यापासून ते दिवाळीपर्यंत चालणाऱ्या सणांच्या काळात खवा, मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची मागणी प्रचंड वाढते. याच संधीचा फायदा घेत काही व्यावसायिक भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे आणि बनावट लेबल लावलेले पदार्थ विकून लोकांच्या जीवाशी खेळतात. या भेसळ माफियांना रोखण्यासाठीच प्रशासनाने ही राज्यव्यापी मोहीम हाती घेतली आहे.

मंत्र्यांचे थेट आदेश, अधिकाऱ्यांची उडाली धांदल!

यावेळी बोलताना मंत्री झिरवाळ कमालीचे आक्रमक दिसले. त्यांनी मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले. ” केवळ दुकानांची तपासणी करून थांबू नका, त्यांच्या स्वयंपाकघरांची (किचन) देखील सखोल तपासणी करा. वापरले जाणारे तेल, तूप, दूध आणि खव्याचे नमुने त्वरित गोळा करून प्रयोगशाळेत पाठवा. अहवाल येताच दोषींवर कडक कारवाईचा बडगा उगारा,” असे निर्देश त्यांनी दिले. या मोहिमेत महसूल आणि पोलीस विभागाचीही मदत घेतली जाणार असून, तपासणीत कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाईचा इशारा त्यांनी दिला.

घोषणा होताच मंत्र्यांची मिठाईच्या दुकानाला धाड!

केवळ घोषणा करून न थांबता, मंत्री झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह थेट सातपूर येथील ‘अंबिका स्वीट्स’ या मिठाईच्या दुकानाला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी दुकानातील वापरलेले तेल आणि खव्याची जागेवरच ‘स्पॉट टेस्ट’ करण्यात आली. या धडक कारवाईमुळे परिसरातील इतर व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. मंत्री झिरवाळ यांनी दुकानदाराला स्वच्छ आणि सुरक्षित अन्नपदार्थ विकण्याबाबत सक्त सूचना दिल्या.

टोलनाक्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’, आश्रमशाळांवर विशेष लक्ष

परराज्यातून येणाऱ्या भेसळयुक्त दुधावर आणि खव्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यासाठी राज्यातील सर्व आरटीओ हद्दीतील टोलनाक्यांवर विशेष पथके तैनात करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच आश्रमशाळा, अंगणवाड्या आणि विविध संस्थांच्या किचनची प्राधान्याने तपासणी केली जाईल, असेही ते म्हणाले. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना तपासणीसाठी आवश्यक ‘टीपीसी मीटर’ सारखी आधुनिक उपकरणे पुरवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

या कार्यक्रमाला जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी राहुल बयाणी, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाचे जालिंदर कराळे यांच्यासह अन्न व औषध प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांनो, सतर्क राहा! प्रशासनाचे जाहीर आवाहन

सणासुदीच्या काळात नागरिकांनीही जागरूक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

मिठाई, पेढे, बर्फी खरेदी करताना ती ताजी आणि दुधापासून बनवलेली असल्याची खात्री करा.

खरेदी केलेल्या वस्तूचे बिल अवश्य घ्या.

कुठेही भेसळीचा संशय आल्यास किंवा काही गोपनीय माहिती द्यायची असल्यास, तात्काळ अन्न व औषध प्रशासनाच्या टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधा. तुमची ओळख गुप्त ठेवली जाईल.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!