खाकी वर्दीला मिळाला सन्मान! पाच अधिकाऱ्यांची पदोन्नतीने पोलीस दलात आनंद!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.११ :-नाशिक शहर पोलीस दलातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पाच कुशल आणि कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकांना सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती मिळाली आहे. या यशस्वी अधिकाऱ्यांनी आपल्या उत्कृष्ट सेवेने पोलीस दलाचे नाव उज्ज्वल केले आहे. श्री. दिवाणसिंग वसावे, श्री. दिनकर कदम, श्री. सुभाष भोये, श्री. इरफान शेख आणि श्रीमती नम्रता देसाई यांचा या पदोन्नतीत समावेश आहे.
हे सर्व अधिकारी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात विविध विभागांत कार्यरत होते. गुन्हेगारी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्था, नागरिकांशी उत्तम संवाद आणि प्रशासकीय कामकाज या सर्वांमध्ये त्यांनी आपली कार्यकुशलता आणि प्रामाणिकपणा सिद्ध केला आहे. त्यांच्या याच अतुलनीय कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर बढती दिली आहे.
पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांनी पदोन्नत झालेल्या सर्व अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत कर्णिक म्हणाले, “या अधिकाऱ्यांनी समाजाची आणि पोलीस दलाची उत्तम सेवा करावी, हीच अपेक्षा आहे.”
या पदोन्नतीमुळे नाशिक शहर पोलीस दलात उत्साहाचे वातावरण आहे. हे पाच अधिकारी आपल्या नवीन पदावर कशा प्रकारे कामगिरी करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे







