मुख्यमंत्र्यांची रक्षाबंधन’भेट’! १० जिल्ह्यांत ‘बचत गट मॉल्स’, ‘लाडकी बहीण’ योजना ५ वर्षे सुरुच राहणार; महिलांमध्ये आनंदाची लाट!

लखपती दीदी’ योजनेतून १ कोटी महिलांना करणार सक्षम, ‘केजी ते पीजी’ शिक्षण मोफत; फडणवीसांचा धडाकेबाज मास्टरस्ट्रोक!

लाल 🚨 दिवा-मुंबई, दि. ९ (विशेष प्रतिनिधी):मुलुंडच्या महाकवी कालिदास नाट्यगृहात रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने जमलेल्या हजारो भगिनींच्या साक्षीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घोषणांचा अक्षरशः पाऊस पाडला! महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महाकाय पाऊल उचलत, राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ‘बचत गट मॉल्स’ उभारण्याची आणि प्रचंड लोकप्रिय ‘लाडकी बहीण’ योजना पुढील पाच वर्षे अव्याहतपणे सुरू ठेवण्याची गर्जना मुख्यमंत्र्यांनी केली. या घोषणांनी उपस्थित महिलांमध्ये जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

महिलांच्या हाती थेट आर्थिक सत्ता!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला सक्षमीकरणावर बोलताना केवळ भावनिक आवाहन केले नाही, तर ठोस कृतीचा आराखडाच सादर केला. “महिलांच्या ५० टक्के सहभागाशिवाय देशाचा विकास अशक्य आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी बचत गटांना मॉल्सच्या स्वरूपात एक मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. यामुळे महिलांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या हातात थेट आर्थिक सत्ता येणार आहे.

‘लाडकी बहीण’ योजनेला अभयदान!

राज्यातील लाखो महिलांच्या खात्यात दरमहा दीड हजार रुपये जमा करणाऱ्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या भवितव्याबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम देत, मुख्यमंत्र्यांनी ही योजना पुढील पाच वर्षे अखंडपणे सुरू राहणार असल्याचे जाहीर केले. “हे केवळ पैसे नाहीत, तर भावाचा बहिणीला दिलेला आधार आहे,” असे म्हणत त्यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाची हमीच दिली.

आता प्रत्येक बहीण होणार ‘लखपती दीदी‘

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘लखपती दीदी’ योजनेचे यश महाराष्ट्रातही दुमदुमत असून, आता राज्यात तब्बल एक कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे महाउद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. “महिलांना दिलेले कर्ज शंभर टक्के परत येते, हा माझा अनुभव आहे,” असे सांगत मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या प्रामाणिकपणाला सलाम केला.

शिक्षणानेच बदलेल चित्र!

“आता भावांनी बहिणीच्या रक्षणाची नाही, तर तिला सक्षम करण्याची शपथ घ्यावी,” असे आवाहन करत मुख्यमंत्र्यांनी ‘केजी ते पीजी’ मोफत शिक्षणाच्या निर्णयाचे महत्त्व अधोरेखित केले. “आज विद्यापीठांमध्ये ‘गोल्ड मेडल’ पटकावणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या वाढत आहे. आता महिलांची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि आमदार मिहीर कोटेचा यांनीही आपले विचार मांडले. मुख्यमंत्र्यांच्या या धडाकेबाज घोषणांमुळे आगामी काळात राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक पटलावर मोठे बदल घडतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

 

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!