सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याची गुंडगिरी, इंदिरानगर परिसरात तणाव; फिर्यादीवरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा डाव?
लाल 🚨 दिवा नाशिक, दि. ०५ (प्रतिनिधी): आज सकाळी एका सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने किरकोळ वादातून एका प्राध्यापकाच्या कानशिलावर रिव्हॉल्व्हर रोखल्याची थरारक घटना घडली आहे. गाडीला कट मारल्याचा जाब विचारल्याने संतप्त झालेल्या नगरसेवक यशवंत (पूर्ण नाव माहित नाही) याने प्रा. राहुल सिंग यांना भररस्त्यात जीवे मारण्याची धमकी दिली. या गंभीर प्रकारानंतर दिवसभर तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या फिर्यादीच्या पदरी मात्र घोर निराशा पडली असून, इंदिरानगर पोलिसांनी राजकीय दबावापोटी केवळ अदखलपात्र (NC) गुन्हा दाखल केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
आज सकाळी ७.१० वाजता प्रा. राहुल सिंग हे आपल्या ॲक्टिव्हावरून कामावर जात असताना, इंदिरानगर येथील समर्थ बँकेसमोर चुकीच्या दिशेने आलेल्या एर्टिगा गाडीने त्यांना कट मारला. प्रा. सिंग यांनी जाब विचारताच गाडीतील नगरसेवक यशवंत याने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढत असतानाच, “तुला दाखवतो मी कोण आहे,” असे म्हणत त्याने भरलेल्या गोळ्यांसह (loaded) रिव्हॉल्व्हर प्रा. सिंग यांच्या दिशेने रोखले आणि “तुझा आता ‘कार्यक्रम’ करूनच टाकतो,” अशी धमकी दिली. प्रा. सिंग यांनी आरडाओरड करताच नागरिक जमा झाले, तेव्हा तो पसार झाला.
पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात!
या धक्कादायक प्रकारानंतर प्रा. सिंग यांचे मोठे बंधू आणि बजरंग दलाचे माजी सहसंयोजक, धर्मकार्यात अग्रेसर असलेले श्री. आशिष सिंग यांनी दिवसभर इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचा दबाव असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. अखेर दिवसभराच्या हेलपाट्यानंतर पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची केवळ अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद केली. रिव्हॉल्व्हर दाखवून जीवे मारण्याची धमकी देणे हा गंभीर गुन्हा असतानाही पोलिसांनी दाखवलेल्या या हतबलतेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
फिर्यादीलाच आरोपी बनवण्याचा प्रयत्न?
एकीकडे पोलीस कारवाई करत नसताना, दुसरीकडे काही तथाकथित समाजसेवकांनी फिर्यादी प्रा. राहुल सिंग यांच्यावरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा हा प्रकार म्हणजे सत्तेच्या गुर्मीचा कळस असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
हिंदुत्ववादी संघटना आक्रमक!
“जर धर्म आणि समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या भावाला दिवसाढवळ्या बंदुकीचा धाक दाखवला जात असेल आणि सत्ताधारी त्याचा बचाव करत असतील, तर धन्य आहे यांचे हिंदुत्व! आम्ही हे कदापि सहन करणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया श्री. आशिष सिंग यांनी दिली आहे. या घटनेमुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली असून, “हिंदू समाजाने या विषयाची गंभीर दखल घेऊन पुढील नियोजनासाठी तयार राहावे,” असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने गंभीर गुन्हे दाखल न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.







