पळापळ अन् थरार… मजुराच्या वेषात लपलेल्या आंतरराज्यीय गुन्हेगाराच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

गुंडा विरोधी पथकाचा ‘करेक्ट’ कार्यक्रम! बंगालच्या फरारी आरोपीला शोधून काढत केली कौतुकास्पद कामगिरी.

लाल 🚨 दिवा नाशिक, दि. ५: पश्चिम बंगालमधील पोलीस कोठडीतून पसार झालेल्या एका सराईत गुन्हेगाराच्या नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपीला जेरबंद करण्यात आले असून, या कामगिरीमुळे नाशिक पोलिसांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सुजॉय बिमल मलिक असे या आंतरराज्यीय फरारी आरोपीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

साधारण एक महिन्यापूर्वी, पश्चिम बंगालच्या पूर्व बर्धमान जिल्ह्यातील कालना पोलीस ठाण्यात सुजॉय मलिक याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (ब) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, दि. २१ जानेवारी २०२५ रोजी वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेत असताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन सुजॉय मलिकने पलायन केले. या घटनेने पश्चिम बंगाल पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. त्याच्यावर पोलीस कोठडीतून पळ काढल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

नाशिक पोलिसांना मिळाली गुप्त माहिती

हा कुख्यात आरोपी नाशिकमध्ये लपल्याची गोपनीय माहिती पश्चिम बंगाल पोलिसांनी नाशिकचे पोलीस आयुक्त मा. श्री. संदीप कर्णीक यांना दिली. माहिती मिळताच, आयुक्त कर्णीक यांनी तात्काळ सूत्रे हलवली आणि या प्रकरणाचा छडा लावण्याची जबाबदारी गुंडा विरोधी पथकावर सोपवली.

गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या टीमने आरोपीच्या फोटोवरून नाशिक शहरात शोधमोहीम सुरू केली. सलग चार-पाच दिवसांच्या अथक परिश्रमानंतर, मोहिते यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून पक्की खबर मिळाली की, फोटोमधील इसम हा सातपूरच्या कार्बन नाका परिसरात मजुरीच्या कामासाठी आला होता.

असा लागला सापळा आणि रंगला थरार!

आरोपी नाशिकमध्येच असल्याची खात्री होताच, गुंडा विरोधी पथकाने पश्चिम बंगाल पोलिसांना पाचारण केले. बंगाल पोलिसांचे पथक नाशिकमध्ये दाखल होताच, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) मा. श्री. किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त कारवाईचे नियोजन करण्यात आले.

पथकाने दिवसरात्र एक करून सातपूर परिसरातील बांधकाम साईट्स, जिथे बंगाली कारागीर कामाला आहेत, त्या सर्व ठिकाणी पाळत ठेवली. दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी, एबीबी सर्कलजवळील जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामावर काही बंगाली मजूर काम करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी सुजॉय मलिकची भंबेरी उडाली. त्याने हातातील कामाची साधने तशीच टाकून धूम ठोकली.

पण, नाशिक पोलीसही तयारीतच होते! सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सुर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, कल्पेश जाधव आणि घनश्याम महाले यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याचा पाठलाग सुरू केला. भरधाव पळणाऱ्या सुजॉयला या पथकाने अत्यंत शिताफीने आणि धाडसाने पकडून त्याच्या मुसक्या आवळल्या.

आरोपीस कालना पोलीस पथकाच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्याला ट्रान्झिट रिमांडवर पश्चिम बंगाल येथे नेण्यात येणार आहे.

या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त मा. श्री. संदीप कर्णीक यांनी संपूर्ण गुंडा विरोधी पथकाचे कौतुक केले आहे. या थरारक कारवाईमुळे नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!