नाशिक हादरले! ‘तू माझीच, दुसऱ्याची होऊ देणार नाही!’; एकतर्फी प्रेमातून माथेफिरूचा तरुणीवर भर कॉलेजमध्ये हल्ला

इन्स्टाग्रामवर दुसऱ्याला का लाईक करते? विचारत तरुणीचा हात पिरगळला, कानशिलात लगावली; आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल, तरुण फरार.

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि.०४ ऑगस्ट:शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या के. के. वाघ कॉलेजच्या आवारातच एका विद्यार्थिनीचा विनयभंग करून तिला मारहाण केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. “तू माझ्याशी बोलत का नाहीस? तू माझीच आहेस, मी तुला दुसऱ्या कोणाची होऊ देणार नाही, नाहीतर परिणाम वाईट होतील,” अशी धमकी देत एका माथेफिरू तरुणाने विद्यार्थिनीचा हात पिरगळला आणि तिच्या कानशिलात लगावली. गेल्या तीन महिन्यांपासून तरुणीने बोलणे बंद केल्याच्या रागातून आणि इन्स्टाग्रामवरील लाईक-फॉलोवरून हा प्रकार घडला. या घटनेमुळे आडगाव परिसरात आणि शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात राहुल विष्णू काशिद (वय २४, रा. दिंडोरी रोड, म्हसरूळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सध्या फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, पीडित तरुणी के. के. वाघ कॉलेजमध्ये शिक्षण घेते. दि. ०२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर ती घरी जाण्यासाठी कॉलेजच्या पार्किंगमध्ये आपल्या गाडीजवळ आली. त्याचवेळी तिचा पूर्वीचा ओळखीचा असलेला आरोपी राहुल काशिद तिथे आला आणि तिला अडवून तिच्याशी वाद घालू लागला.

“तू गेले तीन महिने माझ्याशी बोलत का नाहीस? इन्स्टाग्रामवर तू कोणाला लाईक आणि फॉलो करतेस?” असे प्रश्न विचारत त्याने तरुणीला भर पार्किंगमध्ये तिच्या मैत्रिणींसमोरच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर संतापाच्या भरात राहुलने तरुणीचा उजवा हात पकडून तो जोरात पिरगळला, ज्यामुळे तिला तीव्र वेदना झाल्या. त्याने तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिच्या गालावर दोन सणसणीत थापडाही मारल्या.

या थरारक प्रकाराने घाबरलेल्या तरुणीला त्याने थेट धमकी दिली. “मला तू आवडतेस, मी तुला दुसऱ्या कोणाची होऊ देणार नाही. जर तसा प्रयत्न केलास, तर याचे परिणाम खूप वाईट होतील,” असे म्हणून तो तिथून निघून गेला.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, हा त्रास आजचा नाही. दि. १५ मे २०२५ पासून पीडित तरुणीने आरोपी राहुलसोबत बोलणे बंद केले होते. तेव्हापासून तो तिचा सातत्याने पाठलाग करत होता आणि तिला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत होता. अखेर त्याच्या त्रासाला आणि या हल्ल्याला कंटाळून तरुणीने धाडस दाखवत कुटुंबीयांच्या मदतीने आडगाव पोलीस ठाणे गाठले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने दि. ०३ ऑगस्ट रोजी रात्री १०:२२ वाजता गुन्हा नोंदवून घेतला. आरोपी राहुल काशिद विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७८, ११५(२), ३५२, ३५१(२)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक काळे, सहायक पोलीस निरीक्षक जगदाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस आरोपी राहुल काशिद याचा कसून शोध घेत असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे कॉलेज परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!