मोतीवाला कॉलेजमधून मोटारसायकल चोरणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात; एका गुन्ह्याची उकल

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि‌.४:मोतीवाला कॉलेज परिसरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या संशयिताला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाने यशस्वीरित्या जेरबंद केले आहे. मेळा बस स्थानक परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. गिरीष भास्कर शिंगुटे (वय २९, रा. सिडको) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून ५०,००० रुपये किमतीची चोरीची हिरो स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गंगापूर पोलीस ठाण्यातील एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे.

नाशिक शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार, गुन्हे शाखेचे पोलीस उप-आयुक्त श्री. किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ चे पथक चोरट्यांचा शोध घेत होते.

तपासादरम्यान, पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि नाझीमखान पठाण यांना एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक मोटारसायकल चोर काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवर मेळा बस स्थानक परिसरात येणार आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड यांनी तात्काळ एक पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. या पथकाने मेळा बस स्थानक परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, संशयित गिरीष शिंगुटे हा नंबर प्लेट नसलेल्या काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरून येताच पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान, त्याने ही मोटारसायकल आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने मोतीवाला कॉलेज, गंगापूर येथून चोरल्याची कबुली दिली. या मोटारसायकल चोरीप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील ५०,००० रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली असून, आरोपीला पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड आणि त्यांचे सहकारी पोहवा/प्रविण वाघमारे, प्रशांत मरकड, नाझीमखान पठाण, संदिप भांड, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, विशाल देवरे, रोहिदास लिलके, पोअं/मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे व चालक पोहवा/सुकाम पवार यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!