पक्ष बदलला, पण ‘पॉवर प्ले’ तोच? अपूर्व हिरे यांच्या बॅनरबाजीवर भाजप श्रेष्ठी गप्प का?
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.३१ : राष्ट्रवादी काँग्रेसला ‘रामराम’ करून नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात राजकीय वादळ निर्माण केले आहे. त्यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवरून भाजपचा ‘प्रोटोकॉल’च गायब झाल्याने पक्षांतर्गत तीव्र नाराजी आणि कुजबुजीला उधाण आले आहे.
शहराच्या कानाकोपऱ्यात हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे भलेमोठे बॅनर झळकले आहेत. मात्र, या बॅनरबाजीने शुभेच्छांऐवजी वादालाच अधिक खतपाणी घातले आहे. अनेक बॅनरवर भाजपच्या स्थानिक आमदारांनाच स्थान देण्यात आलेले नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो असले तरी, स्थानिक आमदारांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काही मोजके बॅनर वगळता बहुतांश ठिकाणी हाच प्रकार दिसून येत असल्याने हा प्रकार अनवधानाने घडला की मुद्दामहून, असा सवाल उपस्थित होत आहे.
- ‘पॉवर प्ले’ची जुनीच सवय?
विशेष म्हणजे, हिरे यांचा बॅनरवरून वाद ओढवून घेण्याचा हा काही पहिलाच प्रसंग नाही. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाही त्यांच्या बॅनरवरून तत्कालीन नेते छगन भुजबळ यांचे फोटो अनेकदा गायब असत. आता पक्ष बदलला, पण ‘पॉवर प्ले’ची शैली कायम आहे का? अशी थेट चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. राष्ट्रवादीतील ‘भुजबळ पर्व’ संपवून भाजपमध्ये आल्यानंतरही त्यांनी स्थानिक नेतृत्वाला डावलण्याचा प्रयत्न केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
- पक्षांतर्गत भूकंपाची शक्यता?
ऐन निवडणुकीच्या तोंडावर हिरे यांचा भाजप प्रवेश पक्षासाठी महत्त्वाचा मानला जात होता. मात्र, प्रवेश करताच त्यांनी लावलेली ही ‘स्वतंत्र’ चुणूक भाजपमधील गटबाजीला खतपाणी घालणारी ठरू शकते. पक्षाची शिस्त आणि प्रोटोकॉलला आव्हान देणारा हा प्रकार भाजपचे वरिष्ठ नेते कसे हाताळतात, याकडेच आता संपूर्ण नाशिकचे राजकीय वर्तुळ डोळे लावून बसले आहे. हिरे यांची ही ‘बॅनरबाजी’ येत्या काळात पक्षांतर्गत भूकंपाचे कारण ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल







