व्याजाच्या वसुलीसाठी घरात डांबून बेदम मारहाण, विनयभंग करत दोन लाखांच्या खंडणीची मागणी; माय-लेकासह तिघांवर गंभीर गुन्हे दाखल
लाल 🚨 दिवा नाशिकरोड,दि.३१(विशेषप्रतिनिधी):व्याजाच्या पैशांच्या वसुलीसाठी एका महिलेला घरात डांबून, अमानुषपणे मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची थरारक आणि संतापजनक घटना नाशिकरोड परिसरात उघडकीस आली आहे. या क्रूर छळाला कंटाळून पीडित महिलेने उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर सावकार माय-लेकासह एका अज्ञात व्यक्तीविरोधात खंडणी, विनयभंग, जीवे मारण्याची धमकी आणि महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नाशिकरोड परिसरात, विशेषतः सावकारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी सौ. सारिका अशोक किर (वय अंदाजे ४५), तिचा मुलगा अमन अशोक किर (वय २३, दोघेही रा. म्हाडा बिल्डींग, देवळाली गाव) आणि खान नावाच्या एका अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा कसून तपास करीत असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, ही घटना केवळ एका दिवसाची नसून पीडित महिलेचा छळ सन २०१८ पासून सुरू होता. पीडित महिलेने आरोपी सारिका किर हिच्याकडून गरजेपोटी काही रक्कम व्याजाने घेतली होती. मात्र, आरोपी सारिका किर हिने ५ ते १० टक्के इतक्या प्रचंड व्याजदराने पैशांची वसुली सुरू केली. गेल्या काही वर्षांत पीडितेकडून तब्बल ३० लाख रुपये रोख आणि सुमारे ५ लाख रुपये किमतीचे पाच तोळ्यांचे मंगळसूत्र असे एकूण ३८ लाख ४५ हजार रुपये जबरदस्तीने वसूल केले.
घर सोडूनही छळ संपेना, घरात घुसून क्रौर्याचा कळस
एवढ्यावरच न थांबता, व्याजाच्या रकमेसाठी आरोपी सारिका आणि तिचा मुलगा अमन यांनी पीडित महिलेला अनेकदा खोलीत कोंडून अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपींच्या सततच्या त्रासाला आणि दहशतीला कंटाळून पीडित महिलेने स्वतःचे घर सोडून शिखरेवाडी येथील माने कॉम्प्लेक्समध्ये भाड्याने घर घेतले. वाटले होते की आता तरी या नरकयातना संपतील, पण सावकारांनी तिचा पिच्छा सोडला नाही.
दि. २९ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आरोपी सारिका किर, तिचा मुलगा अमन किर आणि खान नावाचा एक साथीदार यांनी पीडितेच्या भाड्याच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यांनी घराचा दरवाजा आतून बंद करून पीडित महिलेला अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपी अमन किर याने क्रौर्याची परिसीमा गाठत महिलेच्या सलवारमध्ये हात घालून तिचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर, या नराधमांनी पीडितेला त्यांच्या चारचाकी वाहनात जबरदस्तीने बसवून तिला आणि तिच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.
पोलिसांची तात्काळ कारवाई, ..
या भयंकर प्रकारानंतर अखेर पीडित महिलेने धीर एकवटून उपनगर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेला सर्व प्रकार कथन केला. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी तात्काळ कारवाई करत आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४०(१), ३०८(४), ३०९(४) (खंडणी, जीवे मारण्याचा प्रयत्न), ११८(१) (विनयभंग) यासह विविध गंभीर कलमांन्वये तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरसाठ, सपोनि दाभाडे, पोउनि पवार यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आरोपी माय-लेक आणि त्यांचा साथीदार फरार झाले असून, त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना झाली आहेत. या घटनेने अवैध सावकारीचा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







