नाशिक रोड गुन्हे शोध पथकाला प्रशस्तीपत्रक देऊन गौरव; आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किशोर काळे, वपोनि जितेंद्र सपकाळे यांची विशेष उपस्थिती
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.३० :- शहराच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या आणि गुन्हेगारांच्या मनात धडकी भरवणाऱ्या खाकी वर्दीतील शौर्याला जेव्हा सन्मानाची झालर मिळते, तेव्हा केवळ त्या कर्मचाऱ्यांचाच नव्हे, तर संपूर्ण पोलीस दलाचा ऊर अभिमानाने भरून येतो. असाच एक गौरवशाली क्षण नाशिक पोलीस आयुक्तालयात अनुभवायला मिळाला. अत्यंत थरारक पाठलाग करून, पोलिसांना अनेक दिवसांपासून गुंगारा देणाऱ्या एमडी तस्करांच्या मुसक्या आवळणाऱ्या नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या धाडसी गुन्हे शोध पथकाचा (डीबी पथक) खुद्द पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. या गौरवाने सन्मानित झालेल्या पथकाच्या चेहऱ्यावर कर्तव्यपूर्तीचे समाधान आणि वरिष्ठांकडून मिळालेल्या कौतुकाचे तेज स्पष्टपणे झळकत होते.
आयुक्तालयाच्या दालनात अभिमानास्पद सोहळा
पोलीस आयुक्तालयातील आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या दालनात हा छोटेखानी पण अत्यंत अभिमानास्पद सत्कार सोहळा पार पडला. यावेळी परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त श्री. किशोर काळे आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्रसपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. गंभीर पण तितक्याच गौरवास्पद वातावरणात, आयुक्त श्री. कर्णिक यांनी गुन्हे शोध पथकाचे अधिकारी पी. संदीप पवार, हेड कॉन्स्टेबल विजय टेमघर, अविनाश देवरे, आणि पोलीस कॉन्स्टेबल नितीन भामरे, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे व विशाल कुवर या प्रत्येकाला वैयक्तिकरित्या प्रशस्तीपत्रक प्रदान केले.
आयुक्तांच्या शब्दांनी वाढवले मनोबल
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आयुक्त श्री. संदीप कर्णिक म्हणाले, “तुमच्या या कामगिरीने केवळ एक गुन्हा उघडकीस आणला नाही, तर समाजाला, विशेषतः तरुण पिढीला नशेच्या विळख्यातून वाचवण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. ज्या शिताफीने आणि धाडसाने तुम्ही ही कारवाई पार पाडली, ते अत्यंत कौतुकास्पद आहे. तुमच्यासारख्या कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांमुळेच पोलीस दलाची प्रतिमा उंचावते आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होतो. हे यश म्हणजे सांघिक भावनेचा आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा विजय आहे.” त्यांच्या या शब्दांनी संपूर्ण पथकाचे मनोबल द्विगुणीत झाले. उपायुक्त श्री. किशोर काळे आणि वपोनि श्री. जितेंद्र सपकाळे यांनीही आपल्या पथकाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे कौतुक केले.
अशी होती ती धाडसी कारवाई!
या सत्कारामागे होती ती दिनांक २७ जुलै रोजीची थरारक रात्र! गस्तीवर असलेल्या या पथकाला एक वेरना कार संशयास्पदरीत्या आढळून आली. पोलिसांची चाहूल लागताच, आरोपींनी गाडी सुसाट पळवली. मात्र, या बहादूर पथकाने जीवाची बाजी लावून, चित्रपटालाही लाजवेल अशा पाठलागानंतर गाडी अडवली. गाडीतील सराईत एमडी तस्कर राहुल सोनवणे व त्याचा साथीदार केतन पोहले यांना २९ ग्रॅम एमडी या अमली पदार्थासह रंगेहाथ पकडले. राहुल सोनवणे हा अनेक दिवसांपासून पोलिसांना हवा असलेला आरोपी असल्याने, ही कारवाई नाशिक पोलिसांसाठी एक मोठे यश मानले जात आहे.
या सत्कारामुळे केवळ गौरव झालेल्या पथकाचेच नव्हे, तर संपूर्ण पोलीस दलाचे मनोधैर्य उंचावले असून, गुन्हेगारीविरोधात अधिक ताकदीने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे, हे निश्चित







