‘कोयता गँग’चा थरार! खंडणीसाठी हॉटेलमध्ये नंगा नाच; इंदिरानगर पोलिसांच्या जाळ्यात सराईत गुन्हेगार जेरबंद!

दोन अल्पवयीन मुलांसह चौघे गजाआड; खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचाही समावेश, पोलिसांच्या धाडसी कारवाईने व्यावसायिकांचा जीव भांड्यात पडला!

लाल 🚨 दिवा नाशिक, दि. २८ (आमच्या क्राईम रिपोर्टरकडून):शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या गुंडांना खाकी वर्दीचा हिसका काय असतो, याचा जबरदस्त प्रत्यय इंदिरानगर पोलिसांनी दिला आहे. कोयत्याच्या धाकावर महिनोगणिक खंडणी उकळणाऱ्या आणि पैसे देण्यास नकार देताच हॉटेलमध्ये घुसून अक्षरशः धुमाकूळ घालणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीच्या मुसक्या आवळून पोलिसांनी गुन्हेगारी विश्वाला सणसणीत चपराक लगावली आहे. या थरारक कारवाईमुळे दहशतीच्या छायेत वावरणाऱ्या परिसरातील व्यावसायिकांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

रक्त गोठवणारा तो थरार!…

प्रकरण आहे इंदिरानगरच्या दामोदर चौकातील ‘एस. के. चायनीज’ हॉटेलचे. गेल्या काही महिन्यांपासून आरोपी विठ्ठल मते याने हॉटेल मालकाच्या मनात दहशतीचे बीज पेरले होते. दरमहा एक हजार रुपयांची खंडणी तो वसूल करत होता. पण या सैतानाची भूक वाढली आणि त्याने खंडणीची रक्कम १२०० रुपये केली. इतक्यावरच न थांबता, २७ जुलैच्या रात्री या टोळक्याने क्रौर्याची परिसीमा गाठली.

हॉटेल मालक आपल्या पत्नी आणि मेहुण्यासोबत असताना, विठ्ठल मते, सम्यक उनवणे आणि त्यांचे साथीदार हातात चमकणारे कोयते घेऊन सैतानासारखे हॉटेलमध्ये घुसले. “ए किशा, चल दोन हजार रुपये काढ, नाहीतर हॉटेल जागेवर ठेवणार नाही!” अशी धमकी देत त्यांनी संपूर्ण हॉटेल डोक्यावर घेतले. कोयत्याने हॉटेलमधील सामानाची निर्दयपणे तोडफोड केली आणि गल्ल्यातील चार ते पाच हजार रुपयांची रोकड हिसकावून पोबारा केला. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीची लहर पसरली होती.

  • ‘खाकी’चा अचूक सापळा!

या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच शहराचे पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, उपायुक्त श्री. किशोर काळे आणि सहायक आयुक्त श्री. शेखर देशमुख यांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे यांना आरोपींना २४ तासांच्या आत गजाआड करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार, गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे विजेच्या वेगाने फिरवली. खबऱ्यांचे जाळे सक्रिय करताच, आरोपी स्वराज्य नगर येथील एका घरात लपून बसल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे आणि त्यांच्या धाडसी पथकाने क्षणाचाही विलंब न लावता सापळा रचला आणि अत्यंत शिताफीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसी खाक्या दाखवताच, १) विठ्ठल मते, २) सम्यक उनवणे, ३) रितेश लाटे, आणि ४) ओम भदरगे यांनी गुन्ह्याची कबुली दिली. धक्कादायक बाब म्हणजे, या कृत्यात दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याचे समोर आले.

आरोपी साधे नाहीत, सराईत गुन्हेगार आहेत!..

तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी सम्यक उनवणे याच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा (कलम ३०२) गंभीर गुन्हा दाखल आहे. तर विठ्ठल मते आणि सम्यक उनवणे या दोघांवरही यापूर्वी शस्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या धाडसी कामगिरीमुळे नाशिक पोलिसांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या कारवाईने हे सिद्ध केले आहे की, नाशिकमध्ये गुन्हेगारीला थारा नाही आणि कायद्याचे हात गुन्हेगारांच्या मानेपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!