एका वर्षासाठी स्थानबद्धतेचा आदेश होता मंजूर; एमपीडीए कायद्यांतर्गत नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी.
लाल 🚨 दिवा नाशिकरोड, दि. २८ (आमच्या प्रतिनिधीकडून):नाशिकरोड परिसरात दहशत माजवणारा आणि गेल्या दीड महिन्यांपासून पोलिसांना सातत्याने गुंगारा देणारा सराईत गुन्हेगार अनिकेत उर्फ केरला राजु जॉन (वय २४) याला अखेर नाशिकरोड पोलिसांनी मनमाडमध्ये सापळा रचून मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये एका वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून, त्याची रवानगी नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
- गुप्त माहिती आणि शिताफीची कारवाई, नाशिकरोड पोलिसांच्या कामगिरीला मोठे यश!
शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांनी सराईत गुन्हेगारांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र सपकाळे यांनी आपल्या हद्दीतील कुख्यात गुन्हेगार अनिकेत उर्फ केरला याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. केरलावर शरीर आणि मालमत्तेविरोधातील गुन्हे तसेच खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलीस आयुक्तांनी १० जून २०२५ रोजी हा प्रस्ताव मंजूर केला.
मात्र, कारवाईचा आदेश मंजूर होताच केरला फरार झाला होता. नाशिक शहर, सिन्नर आणि वावी परिसरात पोलीस त्याचा कसून शोध घेत होते, पण तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर २७ जुलै २०२५ रोजी पोलीस उपनिरीक्षक संदिप पवार यांना एका गुप्त बातमीदाराकडून केरला मनमाडमध्ये लपून बसल्याची पक्की खबर मिळाली.
या माहितीच्या आधारे, गुन्हे शोध पथकाने तात्काळ मनमाड गाठले. तांत्रिक आणि मानवी संसाधनांचा अचूक वापर करून पोलिसांनी केरलाच्या ठिकाणाचा शोध लावला आणि सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. दीड महिन्यांचा हा थरारक पाठलाग अखेर पोलिसांच्या यशस्वी कामगिरीने संपुष्टात आला.

- पोलिसांचा तांत्रिक सापळा यशस्वी! फरार ‘केरला’ला मनमाडमधून उचलले, एका वर्षासाठी तुरुंगात रवानगी.
ही उल्लेखनिय कामगिरी पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त श्री. किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक श्री. बडेसाहब नाईकवडे, सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रविण सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदिप पवार आणि गुन्हे शोध पथकातील अविनाश देवरे, विजय टेमगर, नितीन भामरे, विशाल कुंवर, समाधान वाजे, नाना पानसरे, अजय देशमुख, प्रशांत नागरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.







