वापीहून मुंबईकडे जाणारा लाखोंचा प्रतिबंधित गुटखा आडगाव पोलिसांच्या ताब्यात; उत्तर प्रदेशचा चालक अटकेत. अपघाताने अवैध तस्करीचा महामार्ग उघड.
लाल 🚨 दिवा -नाशिक,दि.२७ (आमच्या प्रतिनिधीकडून): चोर स्वतःहून जाळ्यात सापडला’ याचाच प्रत्यय आज नाशिक शहराला आला. नसती गाडी पलटी झाली, नसता हा लाखोंचा गोरखधंदा उघडकीस आला! शहरातील प्रमोद महाजन उद्यानाजवळ, रासबिहारी रोडवर आज पहाटेच्या सुमारास गुटक्याने कचाकच भरलेला एक ट्रक पलटी झाला. या अपघातामुळे या ट्रकमधून होणारी प्रतिबंधित गुटक्याची अवैध वाहतूक उघडकीस आली असून, आडगाव पोलिसांनी उत्तर प्रदेशच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे नाशिक शहर अवैध आणि अमली पदार्थांच्या तस्करीसाठी एक सोयीस्कर मार्ग (कॉरिडॉर) बनले आहे की काय, अशी गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की,
गुजरातच्या वापीकडून मुंबईच्या दिशेने एक ट्रक भरधाववेगाने निघाला होता. आज पहाटेच्या सुमारास नाशिक शहरातील रासबिहारी रोडवरील प्रमोद महाजन उद्यानाजवळील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली.


आडगाव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वरकरणी हा एक साधा अपघात वाटत होता. मात्र, जेव्हा पोलिसांनी पलटी झालेल्या ट्रकमधील मालाची तपासणी केली, तेव्हा ते थक्क झाले. ट्रकमध्ये इतर मालाच्या आडून पोत्यांमध्ये आणि खोक्यांमध्ये खचाखच भरलेला **लाखो रुपयांचा** प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ ट्रकचालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपण उत्तर प्रदेशचे रहिवासी असून वापी येथून हा माल मुंबईकडे घेऊन जात असल्याची कबुली दिली.
अर्थपूर्ण’ दुर्लक्ष तर होत नाही ना?
हा अपघात म्हणजे हिमनगाचे केवळ एक टोक असावे, अशी भीती व्यक्त होत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही काळापूर्वी शहरात असाच गुटक्याने भरलेला ट्रक एका अधिकाऱ्याने पकडला होता. मात्र, मोठी आर्थिक तडजोड करून तो सोडून देण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. ही बाब वरिष्ठांच्या कानावर जाताच, त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला नियंत्रण कक्षाचा रस्ता दाखवला होता. असाच काहीसा प्रकार नाशिक ग्रामीण हद्दीतही घडल्याचे बोलले जात आहे.
या घटनांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, केवळ एका अपघातामुळे ही तस्करी उघड झाली. जर हा अपघात झाला नसता, तर हा ट्रक सहज नाशिक पार करून पुढे गेला असता. याचाच अर्थ, दररोज असे कितीतरी ट्रक नाशिक शहर आणि ग्रामीण भागातून प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून अवैध मालाची, नशेच्या पदार्थांची आणि अमली पदार्थांची तस्करी करत असतील, हा एक गंभीर प्रश्न आहे.
या पार्श्वभूमीवर, पोलीस आयुक्त (शहर) आणि पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांनी या गंभीर बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून शहराच्या वेशीवर आणि महामार्गांवर नाकाबंदी अधिक कडक करण्याची गरज आहे. तसेच, अशा रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्या अंतर्गत ‘घरभेदीं’चा शोध घेऊन हे अवैध तस्करीचे जाळे समूळ नष्ट करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.







